Sunday, November 6, 2011

.... आसमाँ.... भाग - १३ ....

जत्रेतल्या त्या भेटीनंतर मी आणि आसमाँ  बरेच दिवस भेटलो नाही... नाही म्हणायला मी एकदा तिला फोन केला होता ,. तेव्हा  तिच्या भावाचा - फिरोजचा कतारहून  फोन येऊन गेला आणि तिच्याबद्दल त्याने विशेष चौकशी केली असं ती म्हणाली... ती म्हणाली होती कि तिच्या भावाच्या मित्रांनी त्याला आमच्याबद्दल  सगळं सांगितलं असावं...  तिने फिरोजच्या मित्रांचा धसका घेतलेला मला जाणवला... पण मी तिला तसं काही नसेल असं समजावलं... त्यानंतर बरेच दिवस मधे गेले ... इकडे उम्या आणि आसमाँची भाभी- आफरीन ह्यांच्या भेटीही वाढत होत्या ....उम्या प्रत्येक भेटीनंतर आमच्यापुढे त्याचं रसभरीत वर्णन करत होता....  त्यांच्या भेटीबद्दल मात्र माझ्या मनातली भीती वाढतच गेली.... आणि शेवटी जे होऊ नये तेच झालं...
          त्याच झालं असं कि .,  एके दिवशी मी आणि आनंद घरात टीव्ही  बघत असतानाच धडधड दरवाजा वाजला.... दाराची कडी काढून उघडतो न उघडतो तोच  जोरात दार ढकलून  उम्या आत आला.... तो घामाघूम झालेला दिसला आणि घाबरलेलाही....तो धापा टाकत होता ...
-- " अरे काय झालं  ...? " मी त्याला आश्चर्याने आणि काळजीने विचारलं... कारण उम्याला अशा अवस्थेत मी पूर्वी कधी पाहिलं नव्हतं . 
-- " म्याटर झाला यार .... " तो गंभीर स्वरात म्हणाला...
-- " अरे काय झालं सांग तरी... इथे माझं पण टेन्शन वाढतंय... " आनंदही त्याला विचारू लागला.... उम्या आमच्या दोघांना बाजूला सारून आतल्या खोलीत गेला, तिथे ठेवलेली पाण्याची बाटली त्याने तोंडाला लावली... घटाघटा पाणी पिल्याचा आवाज येत होता ...पाणी पिल्यानंतर तो मटकन खाली बसला...तो अजूनही धापा  टाकत होता ... घामामुळे असेल किंवा पिताना सांडलेलं पाणी असेल , त्याचा शर्ट ओला झाला होता ... डोळ्यात भीती आणि चिंता ह्यांचा गंभीर मिश्रण झालेलं मला दिसलं...
-- " उम्या ... काय झालं ते सांगशील का...?? " मी त्याला शांतपणे  विचारलं ... त्याने एकदा माझ्याकडे आणि आनंदकडे बघितलं....
-- " तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही......मी आणि आफरीन  सापडलो  रे .... तो ...तो... फिरोज साला कुठून कसा आला मला काहीच कळलं नाही .... " त्याने  अतीव नैराश्येने उच्चारलेलं हे वाक्य मणभर वजनाच्या हातोड्यासारखं माझ्या डोक्यावर आदळल ....
-- " काsss.य ..??  काय बोलतोयस काय तू....? फिरोज कसा येईल ...?? तो तर कतारला ..... " माझा विश्वासच बसत नव्हता.
-- " ते मला माहित नाही ... पण तोच... तोच ... होता तो .... मी तिथून कसा पळालो ते माझ मलाच माहित.... " उम्या नकारार्थी मान हलवत  बोलत होता...
-- " मूर्ख माणसा ... तरी मी तुला नेहमी सांगत होतो ... ह्या लफड्यात पडू नको म्हणून....माझ काही ऐकलंच नाहीस तू ... अरे तो फिरोज माणूस नाही , राक्षस आहे ... " माझ्या डोक्याचा ताबा आता रागाने घेतला होता .... मी उम्याला वारंवार ह्या बाबतीत बजावलं होतं पण त्याने नेहमीच ते हसण्यावारी नेलं..... मला आतून असं वाटायचं कि उम्याच्या ह्या वागण्यामुळे मीही कधीतरी  अडचणीत येणार ...
-- " हे प्रकरण खूप वाढणार उम्या...." मला पुढची चिन्ह साफ दिसत होती...
-- " पण...पण ... आता मी काय करू रे... ?? " उम्या अत्यंत काळजीच्या स्वरात म्हणाला...
-- " आता काय करणार ...? आपल्या हातात आता काही नाही... जस्ट वेट अंड वॉच...." मी उम्याला असं बोलत असतानाच खाडकन दरवाजा उघडल्याचा आवाज आला .... त्या आवाजाने आम्ही तिघेही दचकलो... दरवाज्यात बघतो तर साक्षात फिरोज आणि त्याचे ते मित्र  उभे  ...!  आगीचा लोळ अंगावर यावा तसा फिरोज आणि त्याचे  दोन साथीदार आमच्या अंगावर आले ... त्याच्या त्या दोन मित्रांनी आनंद आणि मला बाजूला ढकललं... फिरोज उम्याच्या दिशेने गेला ...उम्या तर काळ जवळ आल्यासारखा घाबरत उठण्याचा प्रयत्न करत असतानाच....
-- " साले मा sss दरचोद .... " म्हणत  फिरोजची हातोड्यासाखी भासणारी पोलादी मूठ उम्याच्या पोटात शिरली.... धप्प ... आणि त्याबरोबर उम्याचा अतीव वेदनेने कण्हण्याचा आवाज आला . त्याच्या पोटात फाईट इतकी जोरात बसली होती कि तो वेदनेने फिरोजसमोर खाली वाकला.... फिरोजने क्षणाचाही विलंब न लावता समोर वाकलेल्या उम्याच्या कानावर एक जोरदार प्रहार केला ... उम्या झाड  उन्मळून पडावं तसा त्याच्या उजव्या बाजूला पडला.... त्याचा एक हात  पोटावर आणि एक कानावर ठेऊन वेदनेने कण्हू लागला ...ह्या घटना इतक्या जलद घडल्या कि मला आणि आनंदला काही हालचाल करायला वेळच मिळाला नाही... फिरोज बरोबर आलेल्या त्या दोन दानवांनी आम्हाला पुरतंच जखडून टाकलं होतं.....  फिरोज तर रागाने वेडापिसा झाला होता... आता खाली पडलेल्या उम्याच्या  पोटात त्याने एक लाथ घातली... तो त्याला तसाच मारत राहिला असता ... पण  मी मधेच बोललो ... " फिरोज ...  एक मिनिट थांब ..... " माझे शब्द ऐकून तो अचानकपणे थांबला ... त्याने एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर टाकला.... ते त्याचे डोळे आहेत कि पेटते निखारे ..! असा क्षणभर मला भास झाला ....तो आता माझ्याकडे चालत येऊ लागला... फिरोजच्या एका मित्राने मला घट्ट पकडून ठेवलं होतं.... मला काहीच हालचाल करता येईना ... 
-- " साले तू भी मेरे बेहेन के साथ ......" असं म्हणत त्याने उगारलेली मूठ आणि रागाने लाल झालेला त्याचा चेहरा  क्षणभरच मला दिसला .... दुसऱ्याच क्षणी एक जबरदस्त फाईट माझ्या पोटात बसली... मला तर कुणीतरी माझं आतडं  ओढून काढतंय असं वाटलं... वेदनेने माझ्या डोळ्यावर अंधारी आली....मी मटकन खाली बसलो ... पुढे फिरोज काहीतरी बोलला , पण मला काहीच ऐकू आलं नाही ... तो पुन्हा उम्याकडे जायला लागला...  उम्या एव्हाना उठून उभा राहिला होता .... त्याचे हात अजूनही त्याच्या पोटावर होते ., चेहरा वेदनेने पिळवटून निघालेला...   मी डोळे उघडून बघितलं तर आता फिरोजच्या  हातात एक मोठा लखलखता रामपुरी चाकू होता.... तो संथ पावलं टाकीत उम्याच्या दिशेने जायला लागला... त्याने एका हाताने उम्याची कॉलर पकडली...उम्यावर तो चाकूचा वार करणार इतक्यात उम्याने  सर्व शक्तीनिशी बाजूला सरकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे चाकूचा निसटता वार उम्याला लागला ... त्याच्या डाव्या दंडातून रक्ताची एक चिळकांडी आणि त्यापाठोपाठ उम्याची  भयाकारी किंकाळी बाहेर पडली.... उम्या धडपडत बाजूला पडला ... तो उम्यावर आणखी वार करणार इतक्यात ....
-- " फिरोज.... रुक जा ... " दरवाज्यातून एक  आवाज आला... फिरोजचा आणखी एक मित्र आत आला...
-- "आज तो  मै इस हरामजादेको  मार हि डालुंगा .... " फिरोज आणखीनच भडकला .... त्या नवीन आलेल्या मित्राने त्याला आवरलं... पण तो काही ऐकेनाच...
-- " फिरोज मेरी बात सून.... ऐसी गलती मत कर.... चल.... जल्दी घर चल.... तेरी जरुरत है वाहा पे .... "
-- " क्या हुआ ...?? " त्याने रागाने विचारलं.
-- " तू जल्दी चल .... रास्तेमे बताता हुं......" असं म्हणत तो जवळ जवळ फिरोजला खेचूनच घेऊन जाऊ लागला... त्याचे  ते  दोन  दानव  मित्रपण त्याच्या  पाठोपाठ गेले ... इकडे उम्या रक्तबंबाळ अवस्थेत  वेदनेने विव्हळत पडला होता ... मी आणि आनंद त्याच्याकडे धावलो... त्याला उठवून बसवला... आनंद ने त्याला पाणी प्यायला दिलं ... तो कसाबसा थोडंसं पाणी प्यायला ....
-- " अरे ह्याला लवकर हॉस्पिटलला  नेला पाहिजे.... " आनंद माझ्याकडे बघत घाईघाईने  म्हणाला... आम्ही त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो....कसाबसा त्याला रिक्षात घातला....  हॉस्पिटलला  जाईपर्यंत उम्याची अवस्था खूपच बिकट झाली होती ... वेदनेने त्याला ग्लानी आली होती बहुतेक....! त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केला ...
         "  ह्या उम्याला असल्या बाबतीत मात देणारा अजून जन्माला यायचा आहे ...." उम्या  पूर्वी बोललेला   हे वाक्य मला आठवलं ....   ' उम्या , तो माणूस ३०-३२ वर्ष आधीच जन्माला आला होता रे .... ' मला त्याला सांगावसं वाटत होतं ...