Sunday, October 30, 2011

..... आसमाँ... भाग - १२ .....

मध्यरात्री कधीतरी फोनच्या रिंग ने मला जाग आली .... डोळे किलकिले करत मी सहज बघितलं तर आसमाँचा फोन होता...खाडकन माझी झोप  उडाली ....मी  उठूनच बसलो.... इतक्या रात्री तिने यापूर्वी कधी फोन केला नव्हता ... साहजिकच मी घड्याळात बघितलं, रात्रीचे १२:३० झाले होते .... अरे बाप रे ..!! काय झालं असेल ते एवढ्या रात्री तिने फोन केला...?? मी फोन उचलला... पलीकडून आवाज आला...
-- " हाय  मकरंद...  कसा आहेस....?? " आसमाँ फोनवरून विचारात होती.... 
-- " आसमाँ...!! काय झालं...?? सगळं ठीक आहे ना...?? इतक्या रात्री फोन...??? " मी धडाधड प्रश्न विचारले...
-- " काई नाई... ठीक आहे सगळं ..." ती सहज बोलली , जणूकाही काही झालच नाही...
-- " अगं मग इतक्या रात्री फोन कसा काय केलास...?? " माझ्या चिंतेचं आता वैतागात  रुपांतर व्हायला लागलं....
-- " का..?? नको करू का फोन ...?? " ती लटक्या रागात म्हणाली...
-- " अगं,  तसं नाही... बरीच रात्र झाली ना म्हणून  विचारलं , काही प्रोब्लेम नाही ना ...?? " मी शक्य तितक्या शांत आवाजात  म्हणालो.
-- " अरे , मला झोप येत नव्हती...सारखा तुझा चेहरा दिसतो मला .... " ती थोड्या लाडातच येऊन म्हणाली.....मी कपाळाला हात लावला... आता ह्या पोरीला काय म्हणावं ते मला कळेना ...  तिच्या त्या बोलण्याने जो थोडा फार वैताग आला होता तोही पळाला...
-- " काय झालं..?? का येत नाही झोप... ??" मी पुन्हा बिछान्यात आडवा पडत म्हणालो....आता तिला झोप येत नव्हती म्हणून तिने माझी पण झोप घालवली...
-- " सहजच.... मी उद्याचा विचार करत होते... उद्या ना , भातीस गावचा उरूस आहे .... खूप मोठी यात्रा भरते... मी जाणार आहे , तू येशील...?? " ती विचारात होती....
-- " पण तू तुझ्या घरच्यांबरोबर जाशील ना...?? " मी आपली एक शंका काढली...
-- " नाही , तू येणार असशील तर मी सांगेन कि मैत्रिणीबरोबर जाईन म्हणून " तिने लगेच तोडगा काढला .
-- " तू पण ग्रेटच आहेस आसमाँ...." मी म्हणालो...
 --" अरे ए बाबा ,. झोप ना आता ... इतक्या रात्री कसल्या गप्पा मारतोयस ..." माझ्या शेजारी झोपलेल्या आनंदची झोपमोड झाल्याने तो वैतागून बोलू लागला... " आसमाँ मी तुला सकाळी फोन करतो ... मग जाऊ आपण ,  तू आणि मी दोघेच...बाय ..! " मी फोन ठेवला , आनंद कडे एक घाणेरडा कटाक्ष टाकून मी झोपेची आराधना करू लागलो ... मला झोप कधी लागली ते कळले नाही...
         दुसऱ्या  दिवशी मी  ठरल्याप्रमाणे शिवाजी स्टेडीयम च्या जवळ तिची वाट बघत उभा होतो . ती थोड्या वेळातच आली... तिने सुंदर मोरपंखी रंगाचा चुडीदार घातला होता ....तशाच रंगाची ओढणी ... सुंदरच दिसत होती ती... काजळ लावल्यामुळे  तिचे बदामी डोळे आणखीनच रेखीव दिसत होते...
-- " चल जाऊया ..." ती येत येत म्हणाली...
--" जशी आपली इच्छा ....!! " गमतीने म्हटलेल्या माझ्या वाक्यावर ती गोड हसली ...ती हसली कि सगळं जग कसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं ... ग्रीष्मातल्या पहिल्या पावसाच्या सरीसारखं ...! आम्ही भातीस गावाला जायला निघालो... बरेचसे लोक त्या यात्रेला जाताना दिसत होते ... ते गाव तसं फार लांब नव्हतं... सिटी बस ने आम्ही १५ मिनटात तिथे पोहोचलो...तिथे एका मोठ्या पटांगणात रांगेने तात्पुरते स्टोल लावलेले होते ...मिठाई , वडापाव , भेळपुरी,  खेळणी असले स्टोल उभे होते ... 
-- " पीरबाबा  चा उरूस दर वर्षी भरतो... सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन तो साजरा करतात... " आसमाँ बस मधून  उतरता उतरता उरुसाबद्दल सांगत होती ...
-- " हो का ... अरे वा..!!  पण जास्त गर्दी दिसत नाही ... " तिथे असलेल्या तुरळक गर्दीकडे बघून मी म्हणालो..., एरवी मुंबईत ऑफिस च्या वेळेत एका ट्रेन मधून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या याहून जास्त असेल ,  गावची जत्रा अशी किती मोठी असणार...?? 
--" अरे आपण खूप लवकर आलोय... खरी गर्दी रात्री होते. आपण मुद्दामच ह्या वेळी आलोय... दर्शनही नीट होतं त्यामुळे... " तिने लगेच कारणमीमांसा केली... आम्ही प्रथम नारळ आणि फुलांच्या दुकानात गेलो... तिथे तिने एक फुलांची चादर विकत घेतली... " हि फुलांची चादर दर्ग्यावर वाहायची ... " ती सांगत होती... 
त्यानंतर आम्ही दर्शन रांगेत उभे राहिलो... " रात्री हि रांग त्या खाडीपर्यंत जाते इतकी गर्दी होते " ती अभिमानाने सांगत होती... तिने डोक्यावर ती मोरपिशी रंगाची ओढणी घेतली ... आता ती आणखीनच शालीन वाटू लागली.... दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो तेव्हा मागची रांग थोडी वाढलेली दिसली... मग आम्ही जत्रेत फिरू लागलो...
-- " लहानपणी आम्ही खूप मजा करायचो ह्या जत्रेत ...अम्मीकडून पैसे घेऊन बर्फाचा गोळा खायचो , काय धमाल यायची म्हणून सांगू....!! " ती ख़ुशीत  येऊन बोलत होती....
-- "चल  मग,  आता पण खाऊ की..." मी तिला गोळेवाल्याची गाडी दाखवत म्हणालो ... पिवळा , नारंगी , लाल अशी रंगछटा असलेले गोळे त्या गोळेवाल्याने आमच्या हातात  दिले ... त्यातून निघणारा रस आम्ही शोषून घेऊ लागलो...मी  गोळा खाता खाता तिच्याकडे पाहिलं तर तिचे ओठ गोळ्याच्या रंगामुळे आणखीनच लाल झाले होते ... मला सोनदुर्गावरची ती बेधुंद रात्र पुन्हा आठवली...
-- " अरे कसला विचार करतोयस ..?? तो बघ सगळा रस खाली पडतोय..." ती गोळा खाता खाता म्हणाली...मी भानावर आलो , गोळा खाणार इतक्यात तो  त्याला लावलेल्या काडीवरून खाली पडला.  ती खुदुखुदू हसू लागली ...  हातात उरलेली ती  काडी मी  टाकून दिली... माझी फजिती झालेली बघून ती आणखीनच हसायला लागली... आम्ही तिथून निघालो... खाडीच्या शेजारी पाळणेवाल्यांचा विभाग होता तिथे जाऊ लागलो...
-- " चल , त्या मोठ्या पाळण्यात बसणार का तू..?? " मी तिला विचारलं.
-- " नको बाबा... मला भीती वाटते तसल्या पाळण्यात बसायला... " ती नकारार्थी हातवारे करत म्हणाली .
-- " त्यात काय भ्यायचं...?? अगं मजा येते जाम..." 
-- " नाही... मी नाही बसणार... तू बस पाहिजे तर... " 
-- " तू नाही तर मी पण नाही...." मी माझा निर्धार स्पष्ट केला... 
-- " जाऊ दे आपण तिकडे ती खेळणी बघू... " तिने खेळण्यांची दुकाने दाखवली... आता जत्रा म्हटली कि जत्रेतली ती पारंपारिक खेळणी असणारच... ते डमरू ... बेचक्या...... कागदाच्या आणि रंगीबेरंगी पिसे लावलेल्या गोल टोप्या ... पिपाण्या... धनुष्यबाण... तलवारी...असली खेळणी मी लहानपणापासून प्रत्येक जत्रेत बघत आलो आहे... . आणि इथून पुढेही ती जत्रेतली खेळणी कायमच राहणार आहेत... त्यामुळे त्यात काय नवीन बघायचं...?? पण तरीही मी तिच्या मागून जाऊ लागलो... अचानक ती थबकली ... आणि मागे वळून चालू लागली.... " अगं ...?? काय झालं...?? खेळणी बघायचीत ना तुला...?? " मी आश्चर्याने तिला विचारलं... 
-- " शु  sssss .... काही बोलू नकोस आता ... मागे चल परत..." ती दबक्या आवाजात म्हणाली.... मला काही कळेना काय झालं ते... आम्ही मागे जाऊन एका दुकानासमोर थांबलो ..
-- " काय झालं आसमाँ ? सांगशील का...?? " 
-- " अरे तिथे भैयाचे मित्र उभे आहेत  ... मागे नाही का तारा उद्यान मध्ये भैयाच्या बरोबर होते ते.... त्यांनी बघितलं वाटतं आपल्याला ... " ती घाबरत बोलू लागली...
-- " कुठे आहेत... ? " म्हणून  मी त्या दिशेला पाहू लागलो... खेळण्याच्या दुकानाच्या समोर ते दोघे उभे होते आणि थेट आमच्याकडेच बघत होते... आयला काय वैताग आहे .... 
-- " पण त्यांना काय प्रोब्लेम आहे आपण फिरलो तर....?? " मी तिला विचारलं...
-- " ते आता नक्कीच भैयाला सांगणार आपल्याबद्दल ... कदाचित  ते आपल्या पाळतीवर तर नसावेत ना...?? " तिने घाबरून एक शंका काढली.... 
-- " छे ... तू काहीतरीच विचार करतेयस... आणि त्यांना कशाला  घाबरायचं....जर आता ते काही  बोलले तर मी बघतोच त्यांना....खूप झालं आता... " मी तिला धीर देत म्हणालो... मला त्या दोघांचा राग यायला लागला...
-- " नको मकरंद .... उगाच भांडणं नकोत.... ती चांगली पोरं नाहीत.... मला तुझी काळजी वाटते...  " ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली..
-- " ठीक आहे ,  बघू चल ..." म्हणत आम्ही पुन्हा मागे फिरलो... खेळण्यांच्या दुकानाकडे पाहिलं तर तिथे ते दोघे नव्हतेच.... आजूबाजूला पाहिलं तरी ते कुठेच दिसेनात ...
-- " बघ ... गेले वाटतं ते .... तू उगाचच घाबरत होतीस .... कदाचित ते सहजच आले असतील फिरायला... " मी तिला समजावण्याच्या सुरात म्हणालो... आसमाँनेही इकडे तिकडे बघितलं ... पण तरीही तिचं समाधान काही झालं नाही...
-- " नाही... ते लोक सहजच फिरायला आलेले नाहीत... काहीतरी भानगड जरूर आहे ..." तिच्या डोक्यातून त्या दोघांचा विचार जातच नव्हता ...
-- " जाऊ दे आसमाँ...चल आपण नेमबाजी करू जरा ....कदाचित त्या दोघांना उडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल...  " छर्र्याच्या बंदुकीने समोर लावलेले फुगे फोडण्याचा खेळ  चालू होता तिकडे बघत मी गमतीने  म्हणालो. पण ती हे सगळं ऐकण्याच्या पलीकडे गेली होती ... 
-- " चल मकरंद .... निघू आपण इथून ... " तिने काहीतरी मनाशी ठरवलं आणि  घाईघाईत म्हणाली .... 
-- " अगं पण... " मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली... " तुला  माझी शप्पथ ....! चल ..." माझा नाईलाज झाला.... नुकतीच बहराला  आलेली जत्रा सोडून आम्ही दोघे परतीच्या वाटेला लागलो.... कोण कुठल्या त्या दोन हरामखोरांमुळे....!!