Thursday, October 20, 2011

.....आसमाँ....भाग - ११ ....

आपल्या बाबतीत भविष्यात काय घडणार आहे हे आधीच ठरलेलं असतं... आपण फक्त वाट पहायची आणि फक्त तेवढंच आपल्या हातात असतं .... माझं सोनगीरीला येणं.... आसमाँचं  अनपेक्षितपणे भेटणं ....तिच्याशी ओळख वाढून त्याचं  प्रेमात रूपांतर होणं .... हे सारंच अतर्क्य होतं.... म्हणजे मी इथे येऊन प्रेमात पडणार हे आधीच नियतीने ठरवलेलं होतं तर...!! आणि  आपली भावनिक  गुंतागुंत  वाढत चालली असल्याची जाणीवही मला आता होऊ लागली.... आताही खिडकीतून बाहेर बघताना माझ्या मनात तिचाच विचार येत होता ....' कसं होईल आपलं...?? ' ह्या तिच्या  प्रश्नाला सध्यातरी माझ्याकडे  उत्तर नव्हतं....मी  कमावता होतो  , स्वतःच्या पायावर उभा होतो  ., तरीही मी कोणत्याही निर्णयापर्यंत येऊ शकलो नव्हतो....मी फक्त तिच्याबद्दल  माझ्या  घरी सांगायची खोटी ! , असा तमाशा होईल कि त्याची कल्पनाच करवत नाही मला ..... आणि तिच्या घरची परिस्थिती तर आणखीनच खराब असणार..... नाही म्हणायला तिच्या भावाने एक झलक  दाखवलीच होती....!! ह्या असल्या विचारांमुळे माझं डोकं फिरायची वेळ आली .... आता ह्यावर एकच उपाय ,  तो म्हणजे विचार  न  करणे ...! आणि ती खूप कठीण गोष्ट होती  ..... खिडकीतून बाहेरच्या गाड्या आणि येणारी जाणारी माणसं  मी बघत बसलो....  बाजूला आनंद कसलं तरी रहस्यमयी पुस्तक वाचत पडला होता ... 
संध्याकाळ उलटून आता अंधार पडला  .... हा उम्या कुठे गेला होता कुणास ठाऊक...?? मी आनंदला विचारलं तर त्याने नुसतीच नकारार्थी मान हलवली... वाचनात तो अगदी दंग झाला होता ... कसल्यातरी रहस्याचा उलघडा होण्याच्या टप्प्यावर  तो आला असावा .....  मी टीवी लावून बसलो... त्यावरही काही चांगला कार्यक्रम नव्हता... मग  नुसतेच chanal बदलत बसलो...  उम्या घरी आला तेव्हा रात्रीचे ८:३० झाले होते ...
-- " कुठे होतास रे ...?? " आनंद ने विचारले . 
-- " काय सांगू यार तुला...!!" उम्याच्या चेहऱ्यावर मिश्कीलपणाचे भाव दाटले होते...मला त्याचा संशय यायला लागला....
--"  उम्या कुठे होतास तू....?? " मी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला
-- " आफरीन ला भेटायला गेलो होतो रे ..." उम्या सहज म्हणाला... मला कळेना कोण आफरीन ते....!! असेल कोणीतरी त्याच्या अगणित मैत्रिणींपैकी एखादी म्हणून मी पुढे त्याला काही विचारलं नाही ...पण ते काम आनंद ने केलं ... त्याला उम्याच्या असल्या बाबतीत नेहमीच जरा जास्त रस असतो ...
-- " तीच रे .... त्या दिवशी घड्याळाच्या दुकानात नाही  का बघितली ...? आणि काल मी तुम्हाला सांगितलं पण होतं पार्टी च्या वेळी...." उम्या माझ्याकडे बघत म्हणाला ... आईशपथ ...!!! मला भीती होती तसंच  झालं .... आणि  आसमाँच्या भाभीचं नाव आफरीन आहे ..??  इतके दिवस मी आसमाँबरोबर आहे पण मला हे माहित नव्हत ...आणि माहित असण्याचं कारणही नाही.... ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता कशाला विचारा...??
--" अरे वा,  मेरे शेर....!!! मग ...? कुठे गेला होता..?? " आनंद मस्करीत कोपराने ढोसलत  उम्याला विचारात होता ...
--" घाटे बीचला ..... संध्याकाळी ... मस्त ..... " उम्याने उर्ध्व लागल्यासारखे डोळे मिटले ...
--" ती कशी काय आली तुझ्याबरोबर...?? " माझा अजूनही त्याच्यावर विश्वास बसेना ....एक लग्न झालेली बाई  अशी अचानक कशी वागू शकते ...??
--" तुला सांगितलं नाही का....?? मी मुद्दाम तिला २-३ वेळा भेटलो ...परवा पण चुकून भेटलो असं भासवल ...आणि आजच्या भेटीबद्दल मी सहज विचारलं तर ती ' हो ' म्हणाली ...." उम्या सहजपणे सांगत होता. एक सुंदर स्त्री .... जिचं नुकतंच लग्न झालंय.... तिचा नवरा तिच्यापासून खूप दूर आहे ....आणि जवळ असला तरी त्यांचं पटत नाही .... त्यानंतर उम्यासारखा एखादा भेटतो .... आणि आपण हून भेटीबद्दल विचारतो म्हटल्यावर हे तर होणारच होतं....!! मी असा विचार करत असतानाच उम्या काहीतरी बोलला असावा. त्यावर आनंद लगेच गुदगुल्या झाल्यासारखा उडाला आणि विचारू लागला ," काय सांगतोस  काय...?? काय काय केलंस... सुरुवातीपासून सांग..." उम्याने पाकिटातून एक सिगारेट काढली आणि पेटवून वर बघत धुराची गोल गोल चक्रे सोडू लागला..... मला त्याच्या ह्या स्टाईल बद्दल नेहमी हेवा वाटत आला आहे , कारण खूप प्रयत्न करूनही मला ती धुरांची चक्रे कधी जमलीच नाहीत.... इथे आनंद मात्र घाईला आला होता
-- " अरे हा काय टाईमपास करतोय ...मक्या ह्याला सांग ना पटकन सांगायला ..." आनंद माझ्याकडे बघून बोलत होता . मला तर त्याने आता काही सांगू नये असंच वाटत होतं... मी शांत राहिलो... शेवटी बराच भाव खाऊन  झाल्यानंतर उम्यासाहेबांनी  आपले तोंड उघडले... 
--" मी आणि ती संध्याकाळी घाटे बीच वर गेलो .... पाणीपुरी खाल्ली .... वाळूवर बसून मस्त गप्पा मारल्या ...तिचा आवाज एकदम नशिला आहे यार ...आणि त्याहून ती दिसायला सुंदर.....! नजर तर अशी कि तुझ्याकडे नुसतं तिने बघितलं तर तू तिथेच आडवा होशील .... " तो आनंदकडे बघत म्हणाला...
--" मग...?? " आनंद ने अधीरपणे विचारलं .....
-- " मग ...... मी अंधार होण्याची वाट बघत बसलो ...." उम्या मिश्किलपणे आमच्याकडे बघत म्हणाला ....
-- " सही यार... भारीच आहेस तू......!! पुढे मग ....?? " आनंदचा चष्मा हेडलाईट चमकल्यासारखा मला वाटला  ....पुढचं मला माहित होतं ... उम्याचे प्रताप आम्ही पूर्वीही ऐकले होते ...
-- " मग काय...??? घेतली......!!! "  उम्या अभिमानाने म्हणाला . आनंदने जोरजोरात टाळ्या आणि शिट्या वाजवल्या ....
-- " काय....?? उम्या मूर्ख आहेस का तू...?? अरे तिचं लग्न झालेलं आहे ....तिचं नवरा एक नंबरचा गुंड आहे .... त्याच्याबरोबर ३-४ मवाली नेहमी फिरत असतात...हे माहित आहे का तुला....??" मी हे बोलून गेलो आणि माझी चूक माझ्या ध्यानात आली... पण त्याला आता उशीर झाला होता.....ते दोघेही माझ्याकडे काहीशा अविश्वासाने आणि आश्चर्याने बघत होते ....
-- " तुला कसं रे माहित....??" आनंद ने संशयाने विचारलं...
--" अरे म्हणजे ..... ते म्हणजे .... असू शकतो ना.... तिच्या नवऱ्याला कळलं तर वाट लागेल ना तुझी...?? " मी काहीतरी थातूरमातुर कारण दिलं.
-- " एक मिनिट ...! तू ओळखतोस ना तिला.....?? " उम्याची अनुभवी नजर माझ्यावर रोखली होती ..... मला आता सगळं सांगण्यावाचून पर्याय नव्हता... मी आसमाँ ... तिची भाभी .... आणि तिचा भाऊ फिरोज..... ह्यांच्याबद्दल सगळं सांगितलं.... माझं आसमाँवर प्रेम आहे तेही सांगितलं .... आनंद आता माझ्याकडे अचंबित होऊन  बघत होता.... मी असं काहीतरी केलं असेल ह्यावर त्याचा विश्वास बसला नसावा... उम्याही थोडा विचारात पडला ... मग माझ्याकडे बघत म्हणाला...," आसमाँ म्हणजे आम्ही मागे तुला मांडवीला एका मुलीसोबत बघितलं तीच ना...?? " मी होकारार्थी मान हलवली .... 
-- " ठीक आहे ना मग.... ! आफरीन बाबत तुला काय प्रोब्लेम आहे ...?? " उम्याने विचारलं 
-- "उम्या ,  ती एक विवाहित स्त्री आहे ... तिचा नवरा इथे नसतो म्हणून तू तिचा गैरफायदा घेतोयस...." मी सरळ मुद्द्यावर येऊन म्हणालो....
-- " चुकतोयस तू मक्या ...! मी काही तिच्यावर जबरदस्ती केली नाही ... ती स्वतःहून माझ्याबरोबर आली , म्हणजे तिलाही तेच हवं होतं....आपण काय आज पोरींना ओळखत नाही...!! तिने दिलेल्या सिग्नल वरूनच आपण ओळखलं.....  " उम्याचा हा युक्तिवाद बरोबर होता पण तरीही त्याने ह्या प्रकरणाचा नाद सोडवा असं मला वाटलं .
-- " अरे  , तिचा नवरा  साला जाम खतरनाक आहे .... मी भेटलोय त्याला ...आणि  जर त्याला  तुझ्या आणि त्याच्या बायकोबद्दल कळलं ना तर  तो काय करेल ह्याचा नेम नाही ..." मी उम्याला सावध करण्याच्या उद्देशाने म्हणालो...
-- " तो कुठे आहे इथे....?? तो येतो ६-६ महिन्यांनी .... त्याला काय घंटा कळणार...?? " उम्या बेफिकीरीने म्हणाला ...
-- " अरे पण , माझं ऐक जरा.... " मी त्याला समजवायचा प्रयत्न करत होतो ...
-- " मिस्टर मकरंद ..., ह्या उम्याला असल्या बाबतीत मात देणारा अजून जन्माला यायचा आहे ...."  उम्याने अतीव आत्मविश्वासाने उच्चारलेल्या ह्या वाक्याने मला पुढच्या संकटांची चाहूल  लागली.....  आणि त्याचा प्रत्ययही मला लवकरच येणार होता ....