Saturday, October 8, 2011

.......आसमाँ .....भाग - १० .....


घड्याळाच्या दुकानातल्या अनपेक्षित भेटीनंतर मी आणि आसमाँ पुन्हा भेटलो हे सांगायची गरज नाही..... तिचा व्हिलन भाऊ पण परत कतारला गेलाय  , हे तिने त्यावेळीच सांगितलं  होतं.......संध्याकाळी मांडवीच्या त्या समुद्रात गेलेल्या टोकावर आम्ही दोघे पाण्यात पाय सोडून बसलो होतो ...  लाटा संथपणे पायावर येत होत्या ... उबदार पाणी पायावर आल्यावर मस्त वाटत होतं ....
-- " किती दिवसांनी भेटतोय ना  आपण...?? " ती माझा हात हातात घेत म्हणाली...
-- " हम्म ...खरंच .....मस्त वाटतंय इथे बसून...." मी पायावर येणाऱ्या लाटेकडे बघत म्हणालो...
-- " त्या दिवशी मला खूप राग आला होता भैयाचा ...पण मी तरी काय करणार....." तिनेच विषय काढला
-- " तो भलताच  भडकला होता.... " मी सहज तिला म्हणालो 
-- " भैया खूप रागीट आहे ..... त्याला विशेष काही कारण लागत नाही... आणि त्या दिवशी मी तुझ्याबरोबर होते ना त्यामुळे त्याला जास्तच  राग आला ..." 
-- " तुला खूप बोलला असेल ना तो....!!! " मी तिच्याकडे बघत म्हणालो... तिने फक्त होकारार्थी मान हलवली .
-- " मी त्याला सांगितल कि तू चांगला मुलगा आहेस म्हणून ...पण त्याने माझं काही ऐकलं नाही .... मला माझ्यापेक्षा तुझं खूप वाईट वाटत होतं....सॉरी... जे झालं त्याबद्दल... ! " ती दीनवाणा चेहरा करून म्हणाली..
--" अरे , सॉरी काय त्यात.....?? तुझ्या भावाचं हे वागणं साहजिकच होतं ... पण त्याने एवढं भडकायला नको  होतं ... तो कधी गेला परत...??" मी विचारले
--" तो मागच्या आठवड्यात  गेला ...म्हणजे आपण त्या दिवशी घड्याळाच्या दुकानात भेटलो ना त्याच्या आधल्या दिवशीच्या दुपारी ४ वाजता  तो परत कतारला जायला निघाला  " तिने अगदी तपशीलवार सांगितलेलं ऐकून मला गंमत वाटली ....
-- " आता परत कधी येणार तो...?? " मी विचारलं
-- " तो दर सहा महिन्यांनीच येतो ... आता कदाचित डिसेंबर ला येईल... का रे...??"
-- " नाही असंच सहज  विचारलं ..."
--" जाताना  मला ताकीद देऊन गेला , कि तुला परत भेटायचं नाही म्हणून ...." ती सांगत होती...
--" तरी तू आलीस...? " मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो....तिच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं मला ...
-- " मकरंद ..., कसं होईल रे आपलं...? "  तिच्या विचारण्यात आर्तता होती ...तिला काय विचारायचं आहे हे मला कळलं...
-- " काही नाही सगळं ठीक होईल... तू काळजी  करू  नको ..." मी तिला  धीर देत म्हणालो खरा पण तिने विचारलेल्या  प्रश्नात  तथ्य  होतं हे मात्र नक्की ...भेटणे,  बोलणे , प्रेम करणे ह्या गोष्टी ठीक आहेत , पण पुढे काय...?? पुढची वाट मात्र खूप अवघड आणि काट्याकुट्यांनी भरलेली आहे ... त्यावर चालणं इतकं सोप्पं काम नाही ...मुळातच नुसतं जातीबाहेर केलेलं लग्न आपल्या समाजाला तितकंसं रुचत नाही तर वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी लग्न करणं ही तर दूरचीच  गोष्ट ! ... रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार व्हायला अजून कित्येक शतकं वाट बघावी लागणार कुणास ठाऊक...?
-- " त्या दिवशी तुझ्याबरोबर कोण होता दुकानात... ? " तिच्या  प्रश्नाने माझी विचार साखळी तुटली
-- " हं....  तो ना... तो उम्या ... माझा रूम पार्टनर... आणि ऑफिस मध्ये पण आहे तो आमच्या.... भारी आहे तो माणूस ....!! " मी उम्याची उपरोधिक स्तुती केली...
--" हो , माझी भाभी पण म्हणत होती असंच काहीतरी...." ती म्हणाली...
--" हो का...?? " आसमाँने तिच्या भाभीबद्दल सांगितलं आणि मी उडालोच....!  उम्याने मारलेला बाण तिच्या भाभीला अचूक लागला होता.... आता तो  आणखी पुढे जाणार हे पूर्वानुभवाने माझ्या लगेच लक्षात आलं... उम्याबद्दल सांगायचं झालं तर हा माणूस कपडे बदलावेत तशा मुली बदलतो... आम्ही सोनगीरीला राहायला आल्यापासून दर महिन्याला  आम्ही त्याच्याबरोबर एक नवीन मुलगी बघत आलो होतो.... काय करतो...?  त्यांच्याशी  काय बोलतो...?  देव जाणे ....!! पण मुली  त्याच्यावर भाळतात हे मात्र नक्की...  एव्हाना उम्याने तिच्या  घरचा पत्ताही शोधून काढला असेल... मला आता निराळ्याच चिंतेने ग्रासलं.... उम्या जर असं काही करणार असेल तर त्याला व्यवस्थित समजावलं पाहिजे...
-- " तुझी भाभी काय करते...?? " मी सहज तिला विचारलं...
-- " काही नाही .... घरीच असते ... पण  सध्या ती शिवणकाम शिकतेय ... काहीतरी टाईमपास म्हणून..." ती म्हणाली ....
-- " तुझं चांगलं पटतं न भाभीशी ... ?? " हा प्रश्न मी मुद्दामच विचारला ...
-- " अरे मग काय....!!  ती माझी फक्त भाभीच नाही तर बेस्ट फ्रेंड आहे....पण तू का विचारतोयस हे ....?? " तिने थोड्या आश्चर्याने मला विचारलं.... 
-- " काही नाही ... सहज विचारलं ..... तुझा भाऊ पण दूर आहे ना ... त्यामुळे तिला एकट वाटत असेल ..." मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो...
-- " हो ना... पण भैया जवळ असला काय आणि नसला काय ... त्या दोघांचं जास्त पटत नाही.... मी बऱ्याच वेळा त्या दोघांना भांडताना पाहिलं आहे... भाभी तशी खूप चांगली  आहे , समजूतदार आहे ... पण भैया मात्र नेहमी तिच्याशी भांडण करतो....  " ती  हे जे सांगत होती , द्याट वॉज दि आयडियल कंडीशन  फॉर दि गाय लाईक उम्या  .... तो असल्याच सावजाच्या शोधात असतो ....
-- " चल जाऊया आपण... ?? " उम्याच्या विचाराने माझं आता कशातच लक्ष लागेनासं झालं
--" का...? अजून बराच वेळ आहे अंधार पडायला...." तिला आणखी थोडा  वेळ बसायचं होतं...शेवटी मी तिला काहीतरी कारण सांगून तिथून निघालो ... .. आसमाँला कदाचित विचित्र वाटल असेल ., पण मला आता उम्याशी बोलणं भाग होतं .....
 मी घरी आलो... तर उम्या आणि आनंद कुठे तरी बाहेर जायला निघाले होते ...
-- " काय रे....??  कुठे  ?? " मी विचारलं...
-- "अरे ,  उम्या पार्टी  देतोय... " आनंद उड्या मारायचा तेवढा बाकी राहिला होता.... कसली पार्टी...?  वगैरे मी विचारायच्या आत उम्याने मला मिठीच मारली....
-- " मक्या , दोस्ता.... तूच कारणीभूत आहेस ह्या पार्टीला..." उम्या खुश होऊन हे बोलत होता. पण मला कळेना कि काय झालं ते...?? " आधी चल मग सांगतो...." उम्या मला जवळ जवळ खेचतच घेऊन गेला...आमच्या नेहमीच्या पार्टीच्या हॉटेल मध्ये गेल्यावर त्याने बिअर आणि चिकन ची ऑर्डर दिली.... चिअर्स करण्यासाठी तिघांनीही बिअरचे  मग उंचावले ....६  बिअर संपल्यानंतर आम्ही तिघेही  सेमी- ट्रान्स स्टेज मध्ये पोहोचलो ... मग उम्याने सांगायला सुरुवात केली... आणि मला भीती होती तसंच झालं......घड्याळाच्या  दुकानात  आसमाँच्या भाभीला पाहून तर तो आधीच वेडा  झाला होता ...तिच्या एवढी सुंदर स्त्री त्याने त्याच्या आयुष्यात पूर्वी बघितली नव्हती .... नंतर त्याने तिचा माग कसा काढला .....तो  तिच्याशी  कसा  'चुकून'  भेटला .....मग आणखी एकदा 'योगायोगाने'  पुन्हा त्यांची भेट कशी झाली...  आणि आता ते दोघे पुढे  कसे आणि कुठे भेटणार आहेत ह्याचं  इत्यंभूत वर्णन त्याने केलं .... तो जसजसा सांगत होता तसतशी माझी बिअर पूर्ण उतरत गेली....