Saturday, September 17, 2011

...... आसमाँ.... भाग - ८ .....


त्या  दिवशी ऑफिस मधे असताना आसमाँचा  मेसेज आला 
can we meet today...??
हा मेसेज वाचून मला तर खूपच बरं वाटलं ... खरं तर मला पण सोनदुर्गावरच्या त्या बेधुंद भेटीनंतर तिला पुन्हा भेटावसं वाटतं होतं. आणि योगायोगाने  आज तिचाच मेसेज आला.
 Definatly..... where...? when...??
मेसेज पाठवून मी रिप्लाय ची वाट बघू लागलो...,
 u decide....
ती माझ्यावर सोडून मोकळी झाली ... ठीक आहे ....कुठे भेटूया....?? मी सोनगिरीतली काही चांगली ठिकाणं आठवण्याचा प्रयत्न करू लागलो...एक बाग होती....अगदी उंचावर.... तिथून खाडी आणि दूरवर समुद्र दिसायचा...बरीच जोडपी जातात तिथे... ओके ... तिथेच भेटू....
hmmm.....Tara Udyan...?? 6 p.m. is it ok...??
तिच्या होकार आला .... मग मात्र माझं कोणत्याच कामात लक्ष लागेना ... कधी एकदा ते पकाऊ ऑफिस सुटतंय अस  मला झालं...पावणे सहाला ऑफिस मधून निघालो.... आनंद आणि उम्याला तर मी कलटीच  दिली... तारा उद्यान ला पोहोचायला मला ६:१५ झाले ...पण ती तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा उशीरच येणार ह्या अपेक्षेने मी तिथे पोहोचलो तर बाईसाहेब आधीच हजर....! पण तिने आज बुरखा घातला होता ... माझं मन एकदम खट्टू  झालं ...
-- " काय हे ....किती उशीर....?? " ती लटक्या रागात म्हणली...
--" आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं...?? तू आणि चक्क लवकर...?? " मी पण तिची गंमत केली...त्यावर ती मोकळेपणाने हसली 
-- " आज हे का घातलस...?? " मी तिच्या बुरख्याकडे पहात म्हणालो... 
--" अरे मी जरा अम्मी बरोबर बाहेर गेले होते... मला पण नाही आवडत , पण काय करणार...?? " ती नाईलाजाने म्हणाली. मी समजुतीने मान हलवली 
-- " मग...? त्या दिवशी काय झालं घरी गेल्यावर...?"  मी विषय बदलला...
-- " कधी..??"
-- " सोनदुर्गाच्या रात्रीनंतर ?"  
-- " काही नाही .... अम्मीने विचारलं कि मैत्रिणीची आई बरी आहे का म्हणून..." हे सांगताना ती खुदकन हसली. " पण बरं झालं तू मला तसं करायला सांगितलस , नाईतर माझं काही खरं नव्हतं ..." 
-- " जाऊ दे , तो विचार सोडून दे... , आज तू खुशीत दिसतेस....?? "  तिला भेटल्यापासून मला हे जाणवत होतं.
-- " हो.... वाढदिवसाच्या दिवशी कोणता माणूस दुखी असतो....?? " तिने मिश्किलपणे विचारले..
-- " काय... ?? म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे...?? मग मला आधी का नाही सांगितलस...?? मी काहीतरी गिफ्ट आणलं असतं ना...." मी गोंधळून बोललो....
--" गिफ्टचं काय त्यात ....?? तू आलास तेच खूप आहे माझ्यासाठी...." ती म्हणाली..
--" असं कसं...? काहीतरी द्यायलाच पाहिजे ... " म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो... मला फुलांचं एक झाड दिसलं . कोणतं  होतं ते माहित नाही पण फुलं मात्र छानच होती....त्यातल एक फुल मी तोडलं आणि फिल्मी स्टाईलने हिरो हिरोईनला एका गुढग्यावर बसून जसं फुल देतो तसं दिलं.." many many happy returns of the day ..."  त्यावर ती मुक्तपणे हसली...
--" तू फिल्म्स जास्त बघतोस वाटतं...?? " ती हसत विचारत होती...
--" अं... पूर्वी नव्हतो बघत , पण आजकाल बघतो ..." 
--" कोणत्या फिल्म मधे आहे हे असलं....?? " तीने  गमतीने  वरखाली हातवारे  करत  विचारलं 
--" लवकर घे हे फुल ... माझ्या गुढघ्याला खालचे खडे तोचतायत... " मी घाईघाईत म्हणलो .
--" अं ... हं.... आता तर मुळीच नाही ...." ती लाडात येऊन म्हणाली .
--" अगं बाई  माझ्यावर दया कर... " मी काकुळतीला आलो  . खडे चांगलेच टोचत होते... ज्या लोकांनी हे केले आहे त्यांनाच त्या वेदना कळू शकतील..शेवटी तिला माझी दया आली आणि हसत हसत  तिने ते फुल घेतलं ... मी कसाबसा पायावर उभा राहिलो...पिक्चर मधे साले हे काही पण फालतू  दाखवतात .... त्याचं अनुकरण चांगलंच भोवलं मला ....
-- " हे माझ्यासाठी सगळ्यात चांगलं गिफ्ट आहे ... " ती  समाधानाने त्या फुलाकडे बघत म्हणाली...मी तिच्या जवळ गेलो..
-- " मला तू खूप आवडतेस...." मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. 
--" मला पण...... " ती काही म्हणणार इतक्यात मागून " आसमाँ....." जोरात ओरडण्याचा आवाज आला. आम्ही दचकून मागे पाहिलं... एक ३० -३२ वयाचा तरुण  उभा होता , उंची जवळपास ६ फुट , घारे डोळे ,  वर्ण गोरा ,  कोरलेली दाढी , आणि दोन भुवयांच्या मधे कपाळावर  एक काळा डाग  पडलेला  होता . त्याच्या मागे आणखी दोघे जण उभे  होते. ते पण त्याच्यासारखेच खुनशी वाटत होते .  त्या माणसाचे डोळे रागाने लाल झालेले भासले मला ...
-- " भैया ....... " आसमाँच्या तोंडून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली...तिच्या हातातलं मी दिलेलं फुल केंव्हाच खाली पडलं होतं.....मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला... हा तिचा कतारला राहणारा भाऊ होता,  ज्याविषयी तिने मागच्या भेटीत सांगितलं होतं.... तिच्या भावाची  खाली आमच्या हातांवर नजर पडली ... अगदी चटका लागल्यासारखे आमचे हात एकमेकांपासून विलग झाले ...त्याच्या नजरेत ताकदच होती तशी...!
--" क्या है ये....??" तो एकदम भडकून म्हणाला ...
-- " फि ... फिरोज भैया .., ये.. मेरा.. दोस्त है ..." तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते ...
--" चूप...! " तो एकदम जोरात ओरडला .   तिचा भाऊ  खुनशी  नजरेने    पाहत  माझ्या जवळ  आला . त्याच्या डोळ्यात  जाळ  पेटलेला  दिसत   होता . 
--" नाम क्या है तेरा ...? " त्याने थंडपणे उच्चारलेलं हे वाक्य क्रोधाने भरलेलं होतं...
-- " मकरंद  .... मकरंद  मोहिते  " मी अडखळत  म्हणालो ...
--" करता  क्या है तू ....?? " त्याने पुन्हा  खुनशी प्रश्न  केला  
-- " मी जॉब  करतो  ... महाराष्ट्र  गव्हर्मेंट मध्ये " मी हे का बोललो ते   कळलं  नाही , कदाचित  मी कोणी  असला  तसला  नाही हे मला सूचित  करावसं वाटलं...
--" भैया ...इन्होनेही मेरी जान बचाई थी.... उस दिन ..."  आसमाँ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तसा त्याने एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला... फिल्मची रीळ मधेच खटकन तुटावी तशी ती शांत झाली...फिरोजने  माझ्याकडे त्याच रागात पहिले ,
--" अगर तुने फिरसे आसमाँसे मिलनेकी कोशिश कि तो मुझसे बुरा की नही होगा..." त्याने शांतपणे उचारलेल  हे वाक्य एखाद्या हिंदी फिल्मच्या व्हिलनच्या तोंडचा डायलॉग वाटला मला ... 
--" पण मला आवडते ती....मी तिला कधीही फसवणार नाही...." माझ्या तोंडून बाहेर पडलेल्या ह्या वाक्यावर माझं मलाच आश्चर्य वाटलं ...खरच ... प्रेमात खूप ताकद असते म्हणतात ...!!! त्यावेळी मला तिच्या भावाची भीती वाटत नव्हती , कारण माझी भावना खरी होती. मी हे बोलल्याबरोबर  त्याच्या मागे असलेले दोघेजण माझ्या अंगावर धावून आले.. , पण फिरोजने त्यांना अडवलं . 
-- " तुझे मैं आखरी  बार बोल रहा हुं...." त्याच्या डोळ्यातून आता आग बाहेर येईल कि काय असं वाटलं.
 ... त्याने आसमाँचा हात पकडला आणि तिला खेचतच घेऊन जाऊ लागला...मी मात्र हतबल होऊन पाहत राहिलो...मी काहीही करू शकलो नाही ..... आसमाँने जाता जाता मागे वळून पाहिलं... तिच्या डोळ्यांतून निघालेले अश्रू क्षणभरच मला दिसले....