Sunday, August 7, 2011

...आसमाँ...भाग -७ .....


घड्याळात पाहिलं .... ४:२३ झाले होते ...अजून बराच अवकाश होता ...मी आरामात सोनदुर्गाच्या दिशेने चालत होतो... सोनदुर्गावर गेलेला छोटासा नागमोडी डांबरी रस्ता , एखाद्या सुंदर युवतीच्या कुरळ्या केसांच्या बटीप्रमाणे भासत होता ... रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवताचा हिरवागार गालीचा पसरलेला ...सोनजाई देवीचे प्राचीन देऊळ आणि आजूबाजूचा गोलाकार तटबंदीचा भाग हा सोनदुर्गाचा बालेकिल्ला आहे .... आत जाण्यासाठी मोठी कमान आणि त्याला दरवाजा बसवला होता .... बालेकिल्याच्या बाजूला दाट हिरवीगार वनराई स्वागत करण्यासाठी सज्ज असल्यासारखं वाटत होतं . .. पलीकडच्या बाजूला निळाशार समुद्र पसरलेला.... मी उम्या आणि आनंद बरोबर यापूर्वी इथे आलो होतो, पण आज हा नागमोडी रस्ता ,गवताचा गालीचा, हिरवीगार वनराई आणि सोनदुर्ग निराळेच भासत होते...नव्याने पाहिल्यासारखे....! वर पोहोचलो तेव्हा पाच ला दहा मिनिटे कमी होती... समोर सोनजाईच्या मंदिराचा कळस मावळतीच्या प्रकाशात उजळून निघाला होता...कळसावर भगवा फडकत होता . मंदिराच्या आजूबाजूला लांबवर गोलाकार पसरलेल्या तटबंदीच्या बाजूने लोक फिरताना दिसत होते. देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्या गोलाकार तटबंदी भोवती फिरून माणसे अप्रत्यक्षपणे देवीला प्रदक्षिणा घालत होते.... मी बाहेरूनच देवीचं दर्शन घेतलं ... आणि आसमाँची वाट बघू लागलो..... ५:२० झाले तरी तिचं काही येण्याचं चिन्ह दिसेना...फोन करूया का? .... नको .... थांबू अजून थोडा वेळ....!! इतक्यात ती येताना दिसली. माझ्या आजूबाजूचं वातावरण अचानक प्रसन्न झाल्यासारखं मला वाटलं .गडद निळ्या ड्रेस मधे ती आणखीनच गोरी दिसत होती...
--" हाय ....! " मी तिच्याकडे भारावून बघत म्हणालो...
--" हाय ...! " ती गोड हसली... " कधी आलास तू? "
-- " मी...? बराच वेळ झाला.....तू नेहमी अशीच उशिरा येतेस का? " मी तिला खोटं खोटं रागवत म्हणालो .
-- " अरे नाही ...! अम्मीचं एक काम होतं , ते केलं ... मैत्रिणीकडे जाते आहे असं खोटंच सांगून आले ..." ती उत्साहात येऊन सांगत होती , म्हणजे मुली पण खोटं बोलतात तर...आणि खोटं बोलल्याबद्दल त्यांना भारी गंमत वाटते..." तू देवीचं दर्शन घेतलंस ..? " ती तिची चप्पल काढत म्हणाली... मी नकारार्थी मान हलवली...." चल मग...!" ती म्हणाली...आणि आत जाऊ लागली.मला जरा आश्चर्यच वाटलं .. मग मी पण तिच्या मागे मंदिरात गेलो. आत सोनजाई देवीची अतिशय तेजस्वी मूर्ती होती. मंदिराच्या पश्चिमेकडील खिडकीच्या एका झरोक्यातून मावळतीचे किरण थेट देवीच्या चेहऱ्यावर पडलेले होते. आज खूपच प्रसन्न वाटत होतं मंदिरात येऊन... मी हात जोडले , आसमाँनेही हात जोडले . नंतर तिने गुढघ्यावर बसून देवीसमोर डोकं टेकवलं...पुन्हा उठून डोळे मिटून तिने देवीला नमस्कार केला. डोळे मिटून नमस्कार करताना ती फारच सुंदर दिसत होती..... एखाद्या सुबक मूर्तीसारखी...! मला तसंच तिच्याकडे बघत राहायला आवडलं असतं , पण मंदिरातल्या पुजाऱ्याचा खेकासण्याचा आवाज आला...देवीच्या पाया पडून आम्ही बाहेर आलो..
--" तू देवळात जातेस...?? " मला तिच्या देवळात जाण्याबद्दल आश्चर्य वाटत होतं ...
--" का ? काय झालं ? ? देव तर सगळीकडे सारखाच असतो नं...??? " ती किती निरागसपणे बोलून गेली हे...!! इतकी लहानशी गोष्ट जर लोकांना कळली असती तर धर्माच्या नावावर होणारी सगळी भांडणच संपली असती....
-- " हं .... बरोबर आहे ... " मी तिच्याकडे हसून बघत म्हणालो..." ह्या ड्रेस मधे तू फारच छान दिसतेस..."
--" तुला आवडला ....?? माझ्या भाभी ने दिला आहे ... ही तिची निवड आहे ..." ती उत्साहात सांगत होती...
--" खरंच चांगला आहे ... भाभी म्हणजे तुझ्याबरोबर त्या दिवशी गुहागावला जाताना होती तीच ना..? " मला माहित होतं तरी विचारलं .
--" हो.. तीच...ती माझी फक्त भाभीच नाही तर चांगली मैत्रीण पण आहे ...सुंदर आहे ना ती दिसायला,,,,? ती विचारत होती तिची भाभी खरंच खूप सुंदर होती, पण तिला तसं सांगितलं तर ती काय विचार करेल...? हा माझ्याकडे बघत होता कि भाभी कडे ??
--" हो फारच सुंदर आहे ती ..... पण तुझ्याइतकी नाही ....! " ऐनवेळी सुचलेल्या ह्या वाक्यावर मी स्वतःवरच खुश झालो... आसमाँने लाजून नजर खाली केली , बाकी लाजणं मस्तच होतं...त्यानंतर आम्ही त्या गोलाकार तटबंदीवरून चालत फिरू लागलो...." त्या झाडाखाली बसुया का? " तिने झाड दाखवले , ते झाड एका बुरुजाला लागुनच होते...बुरुजावरून खाली सरळ समुद्र दिसत होता. मला तिथं बसायला जरा भीतीच वाटत होती . आसमाँ मात्र सराईतपणे त्या बुरुजावर चढली ...आणि पाय खाली सोडून बसली. मला पण मग तिचं अनुकरण करायला लागलं..त्या बुरुजावरून खाली बघताना डोळे गरगरत होते ..पण आसमाँला मात्र मजा वाटत होती..
-- " इथे बसून मस्त वाटत ना...? सामने नीला आसमाँ और हम पंछी जैसे उड रहे है ऐसा लगता है ....." तिने पक्षी उडतात तसे दोन हात आडवे पसरले ..... मला तर तिची गंमतच वाटू लागली...समोर सूर्य अस्ताला जाताना दिसत होता ... मी विचार करू लागलो , कि आपण तिला मेसेज पाठवताना जे काही फेकलं होतं ते सगळं तसंच घडत होतं ...
-- " तुझ्या घरी कोण कोण असतं ?? " तिच्या प्रश्नाने माझी तंद्री भंग पावली ....
--" हं .... . घरी...?? आई , बाबा आणि बहिण सुमा ..... तुझ्या ?? "
--" अम्मी , पप्पा , भाभी , दो बेहेने - एक छोटी और एक बडी ... और फिरोज भैया..."
-- " भाऊ काय करतो तुझा ?? " मी सहज विचारलं...
--" तो कतारला असतो ... सहा महिन्यांनी येतो..." ती सांगत होती...भाऊ कतारला आहे ते बरं आहे असं मला उगाचच वाटलं त्यानंतर ती बराच वेळ बोलत बसली, तिच्या घराबद्दल बहिणींबद्दल , तिच्या भाभीबद्दल... मी मात्र नुसता ऐकत होतो...
--" अरे तू काही बोलत नाहीस....?? " तिच्या कदाचित लक्षात आलं कि ती एकटीच बोलते आहे ...
--" तुझं बोलणं ऐकायला मस्त वाटतं ....तू फार गोड बोलतेस ....." मी तिच्या डोळ्यात पहात म्हणालो....तिने लाजून नजर खाली केली... मक्या हीच योग्य वेळ आहे ...बोलून टाक... ! माझ्या आतून आवाज आल्यासारखा मला भासला ...पण तिला आपल्याबद्दल तसं काही वाटत नसेल तर...?? काही वाटत नसतं तर ती इथे आलीच नसती...हा विचार डोक्यात आल्यावर जरा मला बरं वाटलं...तिची नजर अजूनही खालीच होती...
--" आसमाँ , मला तू खूप आवडतेस....." मी एका दमात बोलून टाकलं....क्षणात तिची नजर वर झाली...मुसळधार पावसात लख्खकन वीज चमकल्यासारखी वाटली मला...पण क्षणभरच... लगेच तिने नजर पुन्हा खाली केली... तिचे काहीच उत्तर आलं नाही.....
--" तुला मी आवडत नाही का....? " मी अत्यंत हळुवारपणे विचारले....तिने पुन्हा नजर वर केली... तिच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं मला वाटलं .... डोळ्यात अपार प्रेम दाटलेलं होतं...तिने माझा हात हातात घेतला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं... हे तिच्या होकारापेक्षाही सुंदर होतं... मी पण समाधानाने डोळे मिटले...अचानकपणे अंगावर धावून येणाऱ्या आनंदापेक्षा ह्या समाधानाची अनुभूती अत्यंत निराळी आणि सुखद होती...आता सूर्य पूर्णपणे अस्तास गेला होता...आम्ही तिथे किती वेळ बसलो हे मलाही कळले नाही....काही वेळाने ती दचकून उठली...." वाजले किती...??"
--" ६:३० " मी घड्याळात बघत म्हणालो.
--" काय...??? ६:३० ...?? अरे प्रोब्लेम झाला ..... " ती घाबरत म्हणाली...
--" काय झालं...? " अजून बराच उजेड होता... त्यामुळे घाबरण्याच काय कारण..? असं मला वाटलं...
--" अरे संध्याकाळी ६:०० वाजता किल्ल्याचं गेट बंद होतं..."
--" अरे वा ... हो का...?? " ती कदाचित माझी फिरकी घेत असेल
असा विचार करून मी मजेने तिला म्हणालो..
--" मकरंद ये मजाक नही , मै सच बोल रही हु...." ती एकदम गंभीर चेहरा करून म्हणाली. ज्या अर्थी ती मराठीवरून हिंदीत बोलायला लागली त्या अर्थी तिच्या बोलण्यात तथ्य असावं असं मला वाटलं..
--" काय , सांगतेस काय...?? "असं म्हणत मी गेट कडे धावलो..आसमाँ पण माझ्यामागे आली..दरवाजा खरोखर बंद होता.. मी तो २-३ वेळा हलवून पाहिला , पण व्यर्थ ..! बाहेरून कुलूप असावं ...अरे देवा ....!! " कुणी आहे का....? हेलो...??? " मी हाका मारत होतो पण त्याचा काही फायदा झाला नाही...
--" हम फस गये है .... अब कोई नही आयेगा सुबह तक...." असं म्हणून आसमाँ रडायलाच लागली...मला तर आता काहीच सुचेनासं झालं
--" अगं आसमाँ , हे बघ...आपण दुसरा रस्ता शोधू ... असेल इथेच कुठेतरी..." मी तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ती आणखीनच रडायला लागली... मला आता काय करावे हे कळेना....
-- " यहा कोई दुसरा रास्ता नही... मुझे मालूम है..." ती रडवेल्या सुरात म्हणत होती...तरी मी आजूबाजूला जाऊन पाहिलं..., बालेकिल्ल्याचे बुरुज फारच उंच होते... तिथून उतरायचं म्हटलं तर ते शक्यच नव्हतं... आणि इथे आमची हिरकणी तर आधीच रडायला लागली होती... आता तिथेच थांबण्यावाचून पर्याय नव्हता...खरं सांगायचं तर मी एक रात्रच काय पण एक महिना जरी बाहेर राहिलो तरी मला विचारणारं कोणी नव्हतं.... पण तिची गोष्ट निराळी होती...एक तर तिला विचारणारे तिच्या घरचे होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ती एक मुलगी होती... पण आता आम्ही हतबल होतो... आता त्या बालेकिल्ल्यात फक्त मी आणि तीच होतो...
--" मकरंद मुझे बोहोत डर लग रहा है., एक तो मै झूट बोलके आई हुं ...??" ती रडवेल्या सुरात म्हणाली...
--" आसमाँ , हे बघ , घाबरू नको... आपण करू काहीतरी..." खरं तर मला पंण आता काळजी वाटायला लागली होती....एक तरुण मुलगी , माझ्याबरोबर एका अनोळखी ठिकाणी किल्ल्यामध्ये अडकली होती. आम्ही परत सोनजाई मंदिरात आलो आणि एका बाकड्यावर बसलो... ती माझ्या शेजारीच बसली होती..अंधाराने हळू हळू आता आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली....नाही म्हणायला मंदिरात एक छोटासा बल्ब लावलेला होता ... त्याचाच काय तो प्रकाश...!! आसमाँ मान खाली घालून बसली होती... तिला कदाचित तिच्या घरच्यांचं टेन्शन आलं होतं...
--" तू कधी बाहेर एकटी राहिली नाहीस का ?? " मी विचारलं... तर तिने फक्त नकारार्थी मान हलवली...
--" तुला घरच्यांचं टेन्शन आहे का...?" मी काहीतरी विचारायचं म्हणून तिला विचारलं... त्यावर तिचं काही उत्तर आलं नाही , त्या ऐवजी फक्त एक हुंदका ऐकायला आला...अरे देवा...!! तिला आता सावरायला हवं होतं...मी तिच्या जवळ जाऊन हळुवारपणे तिचा चेहरा माझ्याकडे वळवला...तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या ..
--" आसमाँ, प्लीज रडू नको..... " मी तिच्या गालावरचे अश्रू पुसले...
--" अब क्या होगा मकरंद ....? अम्मी को क्या बोलू मै...?? " ती विचारत होती.. मी थोडा विचार केला...
--" अं ... तू बोल कि आज रात्री मैत्रिणीकडे राहते आहे ..." मी तिला एक कारण सुचवलं...
--" क्युं रेह रही है पूछा तो..? ." तिने लगेच शंका उपस्थित केली.... तिचं बरोबर होतं ... हे तिची आई नक्की विचारेल..
--" मैत्रिणीच्या आईची तब्येत अचानक बिघडली., तिला दवाखान्यात नेली आहे . मैत्रीण घरी एकटीच आहे , तिला सोबत म्हणून थांबली आहेस.. .." मी लगेच तिचं शंकानिरसन केलं...माझ्या उत्तरावर ती काही बोलली नाही.... ती कदाचित ह्या शक्यतेबद्दल विचार करत असावी...
--" जास्त विचार करू नको.., हेच सांग... आपण मुद्दाम तर इथे थांबलो नाही ना....??" मी तिला समजावलं....
--" मगर अम्मी गुस्सा हुई तो....?? "
--" नाही होणार...तू फोन कर...." मी तिला दिलासा देत म्हणालो...तिने थोडा वेळ विचार केला... आणि लांब जाऊन घरी फोन केला....मी विचार करू लागलो कि तिची अम्मी आत्ताच परत घरी ये म्हणाली तर काय करणार ?? , पण असं होण्याची शक्यता फार कमी आहे ... आजारी माणसासाठी थोडी तरी सहानभूती तिची आई दाखवेलच.... अर्थात आसमाँच्या कन्विन्सिंग पावर वर पण हे अवलंबून आहे .. इतक्यात आसमाँ धावतच आली ... तिचं उत्तर काय आहे हे ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले होते.... " मकरंद , यु आर सेविअर .... अम्मी मान गयी..." हमखास उडणाऱ्या एखाद्या
विषयात अचानक पणे पास झाल्यावर होतो तसा आनंद तिला झालेला दिसला... तिचा घरचा प्रोब्लेम मिटला होता.
--" काय म्हणाली तुझी आई....? ?" मी तिला विचारले...
--" अम्मी म्हणाली ,ठीक आहे पण सकाळी लवकर घरी ये... thank you मकरंद ... तुमने मुझे फिरसे बचा लिया..." असं म्हणत ती माझ्याकडे कृतज्ञता मिश्रित प्रेमाने पाहू लागली...डोळ्यांचा डोळ्यांशी मूक संवाद झाला , ती अगदी जवळ आली... तिचे उष्ण ओठ माझ्या ओठांवर टेकले ...डोळे आपोआप मिटले गेले....काळ पूर्णपणे थांबला ... ती विलग झाली मला एका निराळ्याच धुंदीत सोडून......