Sunday, July 3, 2011

.....आसमाँ - भाग -५ ....


                       किनाऱ्यावर लाटांनी पाण्याची एक तात्पुरती सीमारेषा तयार केली होती. भिजलेल्या वाळूवरून ती नागमोडी रेषा स्पष्ट दिसत होती. लाट येईल तशी नवीन सीमारेषा तयार होत होती...मी त्या रेषेच्या हातभर लांब अंतरावर उभा राहिलो . अथांग पसरलेल्या समुद्राकडे पहात......ती मला आज भेटायला येणार होती....मला ते जुनं मराठी गाणं आठवलं.... जिथे सागरा धरणी मिळते .... पण इथे मात्र नायिकेच्या ऐवजी मी वाट बघत होतो...आज त्या गाण्याचा नव्याने अर्थ कळत होता. पहिल्यांदाच वाटलं कि हे वाट पाहणं किती छान असतं ते......
लहानपणी शाळेतल्या सहलीला जायच्या आदल्या रात्री जशी झोप लागत नसे तसंच काहीसं काल रात्री झालं... आज ऑफिस मधून पण लवकर निघण्यासाठी, ' माझा मुंबई वरून एक मित्र आला आहे....त्याला भेटायला जायचंय' , असं मी आमच्या हेडक्लार्क बाईंना सांगून आलो होतो... बाईंनी पण इमानदारीत मला लवकर सोडलं .... मी मुद्दामच लवकर मांडवीला आलो होतो.... जेटीवर न जाता मी समुद्र किनाऱ्यावरच थांबलो ... पण आता बराच उशीर झाला तरी ती अजून कशी आली नाही ?? ... माझी छाती धडधडायला लागली.... आणि ती आल्यावर तिच्याशी काय बोलायचं हा मुख्य प्रश्न तर होताच ....! .मी सहज रस्त्याच्या दिशेने पाहिलं तर ती लांबून येताना दिसली... आईशप्पथ......!!! पण तीच आहे का ती ??? माझा विश्वास बसत नव्हता . मी प्रथमच तिला बिना बुरख्याच पहात होतो... तिने फिक्कट गुलाबी कलर चा चुडीदार घातला होता... त्यावर रेशमी धाग्याची नक्षी उठून दिसत होती.....कानातले झुमके, मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चकाकत होते....तिचा मखमली दुपट्टा वाऱ्यावर उडत होता.... स्वर्गालोकीची अप्सरा जणू भूलोकी अवतरल्यासारखी.....! ती जवळ आली... मी तर तिच्याकडे बघतच राहिलो....

--" मला यायला उशीर तर नाही न झाला ?? " कुणीतरी सतारीच्या तारा छेड्ल्यासारख्या वाटल्या ...
--" अं ..... नाही , फार नाही.... " मी भानावर येत म्हणालो...ती गोड हसली.....
-- " तू आज खूप सुंदर दिसतेयस .... एखाद्या अप्सरेसारखी...." मी हे वाक्य बोलून गेलो खरा , पण नंतर माझं मलाच आश्चर्य वाटलं ... ' वा.. मक्या सुरुवात तर चांगली केलीस....' माझ्या वाक्यावर ती समजुतीने हसली....
-- " तुम्ही पण छान दिसताय आज " तिनेही स्तुतिसुमने उधळली... ' ही आपल्याला अहो - जाहो का करतेय??'
--" तू माझ्याशी एकेरीत बोल ना.... तुम्ही नको तू म्हण..."
--" ठीक आहे .... तू पण छान दिसतोस आज..." तिने लगेच सुधारणा करून मघाशी उधळलेली स्तुतिसुमने पुन्हा उधळली .
--" बास ...!. कळले...!!. " आम्ही दोघेही हसलो.....
_ " बराच वेळ झाला ... मला वाटलं कि तू येतेस कि नाही....." मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोललो...
--" वा ... येणार कसं नाही ...! मीच तुम्हाला इथे यायला सांगितलं होतं ना..."
_" अरे .. परत ... तुम्हाला  ??? " मी तिच्याकडे खोट्या रागात पाहिलं . तिने  लगेच जीभ चावली ... " सॉरी ... सॉरी... " हे बोलताना ती लहान मुलीसारखी वाटत होती... मला मनातल्या मनात हसायला आलं...
_" आपण तिथे बसुया ... वाळूवर ?? " तिने बोटांनी वाळूची जागा दाखवली.....तिथे जास्त गर्दी नव्हती . आम्ही तिथे जाऊन बसलो... तिच्याबरोबर असं एकांतात बसायला खूप बरं वाटत होतं ... हिंदी पिक्चर मधले नायक नायिका एकत्र आले कि गाणी म्हणत का नाचतात ..? याचा उलघडा मला आज होत होता....पूर्वी मला तो मूर्खपणा वाटायचा.....समोर उधाणलेला समुद्र .... त्यावरून येणारा गार वारा ...पायाखाली लागणारी उबदार वाळू ... अस्ताला जाणारा सूर्य .... आणि बाजूला बसलेली सुंदर तरुणी.....आणखी काय पाहिजे...????
_" तू बोलत का नाहीस?? " तिच्या आवाजाने माझं विचारचक्र थांबलं.....
_" नाही.... काही नाही असंच.... " मी म्हणालो... त्यानंतर ती वाळूवर बोटांनी रेघोट्या मारत बसली.....' मूर्खा काहीतरी बोल... ' मी मनात कोणत्या विषयावर बोलायचं याचा विचार करू लागलो.....
_" ए तुझं गाव कोणतं ?? तुला पूर्वी इथे कधी बघितलं नाही ..." ती विचारत होती...
_" मी मुंबईचा आहे ... इथे जॉब करतो..."
_ " जॉब ... आणि इथे ?? लोक मुंबईत जाऊन जॉब करतात... आणि तू ते सोडून इथे गावात काय करतोयस ?? " तिच्या विचारण्यात मिश्कीलपणा आणि आश्चर्य ह्याचं मिश्रण झालेलं दिसलं..
_ " माझी आई पण मला हेच म्हणते..." मी तिच्या बोलण्याला दुजोरा दिला...
--" पण इतकं काही खराब नाही हं आमचं गाव..." तिने लगेच आपल्या गावाची बाजू घेतली...
-- " ते तर दिसतंच आहे ...." हे वाक्य मी मिश्किलपणे तिच्या डोळ्यात पहात म्हणालो ....तिने हसून नजर दुसरीकडे वळवली...थोडी लाजल्यासारखीही वाटली मला ...पण तिच्या डोळ्यात पाहिलं ना कि काळ थांबल्यासारखा वाटतो...अल्बर्ट आईनस्टाईनला रीलेटीव्हिटी चा शोध असाच काहीसा लागला असणार ..... हे काय मधेच डोक्यात आलं ?? स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या भांडवलावर ह्या अशाच प्रकारच्या उपमा सुचणार ....पण उपमा कशीही असो , त्यामागची भावना महत्वाची.... !!! मग मी पण समोर पाहू लागलो... समोर काही अंतरावर दोन लहान मुली वाळूचा किल्ला बनवत होत्या ...
--" बचपन में हम लोग भी समंदर किनारे ऐसेही घर बनाते थे ... खूब मझा आता था .... " ती हरवल्यासारखी बोलत होती...ती हिंदीत बोलायला लागली कि रणरणत्या उन्हात एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यासारखी वाटते .... एक नजाकत का काय म्हणतात ते होतं तिच्या हिंदीत...नाईतर आमची बम्बैया हिंदी...!!
_" तुमको तुम्हारा बचपन अभी भी आठवता है क्या ?? " मी आपला मराठीचा तोडक्या मोडक्या हिंदीत स्वैर अनुवाद केला..
_ " हां ..... और एक बात बोलनी थी तुमसे ...." ती म्हणाली...
-- " क्या?? " आता समोरची व्यक्ती हिंदीत बोलतेय म्हटल्यावर मी पण हिंदीतच विचारलं ...
_ " तुम हिंदी मत बोला करो .... तुम्हें नही आती...." असं म्हणून ती खुदुखुदू हसायला लागली... लहान मुलीसारखी.... . माझा चांगलाच ' वडा' केला तिने ...तिचं ते हसणं पाहून मलाही हसायला यायला लागलं....बराच वेळ आम्ही हसत होतो....
-- " आपण काही खाऊया का?? ...." मी तिला विचारले...
-- " भेळपुरी ... मला खूप आवडते..." ती उत्साहित होऊन म्हणाली... ' अरे वा... भेळपुरी तर मला पण आवडते.....आमच्या दोघांच्या आवडी निवडी जुळतात तर....!!! '
भेळपुरी खात असताना अचानक काही वेळाने आमच्या मागून एक गाणं ऐकायला आलं ....' बम्बैसे आया मेरा दोस्त .., दोस्त को सलाम करो.....' आवाज ओळखीचा वाटला मला ..... माझं डोकं पूर्वी ऐकलेल्या ध्वनिफिती तपासण्याच्या कामाला लागलं ..... अरे देवा !! हा तर उम्याचा आवाज .....मला जोराचा ठसका लागला.... .हळूच मागे पाहिलं तर उम्या आणि आनंद एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फिरत होते...... झालं कल्याण....! ऑफिसमधे मुंबईवरून आलेल्या मित्राची मारलेली थाप हेडक्लार्क बाईंच्या पचनी पडली असेल , पण आमच्या ह्या दोन दानवांना मी काही फसवू शकलो नव्हतो..... आता हे साले तिच्याबद्दल विचारून विचारून माझं डोकं खाणार.....माझं जीना हराम करणार....आता काही खरं नाही .... आमचं खाऊन झालं... अंधारही पडू लागला होता....
-- " मी जाऊ आता , उशीर झाला खूप....." ती विचारत होती...
-- " थांब ना अजून थोडा वेळ...." मला तर तिने जाउच नये असं वाटत होतं.
-- " नाही... नको, अम्मी ओरडेल.... "
-- " परत भेटशील ना...." मी जरा अडखळतच तिला विचारलं .
-- " बघेन.... बाय ..." असं म्हणून ती निघून गेली..... ती निघून गेली खरी.... पण माझं महत्वाचं असं काहीतरी तिच्याबरोबर घेऊन गेली... माझं हृदय ....!!!