Sunday, June 19, 2011

...आस्मा भाग -३ - mirror effect ...

-- "आस्मा तुझी तैय्यारी झाली का , चल जल्दी , निकलते है " भाभी मला विचारात होती.
-- '' हा... भाभी , बस २ मिनट ..." मी घाईघाईने म्हणाले . आम्हाला भाभी च्या माहेर गावी जायचे होते.... गुहागाव ला...मला तिथे जायला खूप आवडतं . निळाशार समुद्र... पांढरीशुभ्र वाळू... माडांची झाडे ... मधूनच दिसणारी एखादी होडी... किसी सपने जैसा .... माझं आणि भाभीच चांगलं पटतं . ती फार सुंदर आहे दिसायला .. आणि हुशार पण .. मला ती खूप मदत करते . फिरोज भैया पण चांगला आहे...पण जरा रागीट ...तो मस्कत ला असतो. ... ४-५ महिन्यांनी येतो तेव्हा आमच्या सगळ्यांसाठी मस्त मस्त गिफ्ट आणतो. पण भाभी आणि त्याचं जास्त पटत नसावं बहुतेक... बऱ्याच वेळा मी त्या दोघांना भांडताना बघितलं आहे . भाभी बिचारी जास्त काही बोलत नाही . पण त्या दिवशी ती खुश दिसत होती... माहेरी जाताना कोणती बाई खुश असणार नाही???? मी पण बऱ्याच दिवसांनी भाभी च्या गावाला जात होते..,. मला मस्त वाटत होतं. खरं तर लवकर निघणार होतो पण मलाच उशीर झाला सगळं आवरायला.... आम्हाला धावतच जाऊन गाडी पकडायला लागली... गाडीत चढल्यावर बसायला जागा शोधात असतानाच ' या आल्हा ' माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. " तो " गाडीमधेच होता.. जरा मागच्या सीट वर बसलेला. .. ' .काय बर नाव त्याचं..?... हा ... मकरंद . पण तो आता माझ्याशी बोलला तर...?' मला एकदम भीती वाटायला लागली. भाभी मला सतरा प्रश्न विचारेल... कोण आहे ? काय करतो ? तुझी आणि त्याची ओळख कशी ? वगैरे वगैरे... तो माझ्याकडे बघत होता पण मी त्याच्याकडे बघायचं टाळलच... पण त्याला कळण गरजेचं होतं कि मी का बोलत नाही म्हणून मी भाभी ला हाक मारली " भाभी इधर बैठते है... " मी भाभी ला आत बसायला दिलं... मी बसताना सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो बाहेर बघत होता. ' तो रागावला वाटतं.... मी त्याला ओळख दाखवली नाही म्हणून .....' मला कसतरीच वाटत होता. ' तो काय विचार करत असेल ?? कि मी हिला एवढ वाचवलं.. आणि ही आता ओळख पण दाखवत नाही...?..' मी विचार करत होते. खरं मला तर त्या दिवसापासून तो आवडायला लागला होता. मधे एकदा तो भेटला पण होता तो . एकदम साधा वाटला मला ... सच्चा ...दिलसे साफ .....माझ्याशी बोलायला पण घाबरत होता तो .... मी परत एकदा सहज मागे पाहिलं , आता तो माझ्याकडेच पाहत होता... आणि थोडासा हसला देखील...' चला, बर झालं , त्याला कळलं असेल कि माझ्याबरोबर कोणीतरी आहे म्हणून.' मी असा विचार करत असतानाच भाभी चा आवाज आला..
-- '' क्या हुआ आस्मा ? तू चूप क्यू है? काय झालं ? "
-- " नै भाभी. ऐसेही ..." मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.
--" तुझं लक्ष नाही मघापासून. कसला तरी विचार करतेयस " भाभी ने माझ्या वागण्यातला फरक बरोबर ओळखला होता .
-- " नै भाभी ... खूप दिवस झाले आपण गुहागाव ला जाऊन ... त्याचाच विचार करतेय..." मी आपलं ठोकून दिलं .. पण मला हे खोट सांगताना खराब वाटत होतं.
-- " हां .... बराबर है ... मला पण जाऊन खूप दिवस झाले... अम्मी वाट बघत असेल ..." भाभी हे बोलत असताना मी तिच्याकडे पाहिलं... ती स्वप्नात असल्यासारखी बोलत होती.... तिला तिच्या घराची आठवण येत होती बहुतेक..... त्यानंतर मात्र ती काही बोलली नाही. नुसती शांत पणे बाहेर बघत राहिली. मी परत एकदा मागे वळून पहिले... मकरंद माझ्याकडेच पाहत होता. मला बर वाटलं...' आज आपण कसे काय भेटलो?? कदाचित तो भेटणार असेल म्हणून मला उशीर झाला सगळं आवरायला ...' मी आपले काहीतरी अंदाज मनाशी बांधत बसले . ' पण आता आपण परत कधी भेटणार??? आज चुकून भेटलो...पण पुढचं काही माहित नाही...' ह्या विचाराने मला एकदम अस्वस्थ वाटू लागले... मला त्याला परत भेटायचं होतं. ' परत भेटण्यासाठी आपल्याला त्याच्याशी बोलाव लागणार... आणि आता तर बोलता येणार नाही...', काय करू ?? ' मला काहीच सुचत नव्हत.... . अचानक मला एक आयडिया सुचली. मी भाभी कडे पाहिलं तर तीला झोप लागली होती. . . मी पर्स मधून पेन काढला आणि माझा मोबाईल नंबर पुढच्या सीट वर लिहिला... दुसऱ्या कुणाला कळू नये म्हणून मी ५-५ च्या ग्रुप मधे आकडे लिहिले. आणि माझ्या नावाचा A तिथे काढला... ' त्याला हे कळायला पाहिजे , नाही तर मग काही फायदा नाही...' मी मनात विचार करत होते. मी मागे बघितलं तो पाहत होता बहुतेक मी काय लिहिलंय ते... नशीब....मी मनात देवाचे आभार मानले... तोपर्यंत आमचा stop आला. मी त्याच्याकडे न पाहताच उतरले उगाच भाभी ला शक यायचा . भाभी च्या घरी आले ... भाभी ची अम्मी तर भाभी ला बघून रडायलाच लागली... भाभीही रडू लागली... मग मला पण डोळ्यात थोडं पाणी आलं. भाभी च्या अम्मी ने आम्हाला बसायला दिलं.... आणि चहा दिला. भाभिच्या अम्मी ने माझी पण विचारपूस केली... .' बराच वेळ झाला आम्ही गाडीतून उतरून... त्याला नंबर कळला असेल न???? तो नंबर दुसऱ्या कुणाला मिळाला तर ???' मला एकदम भीती वाटायला लागली.... 'शिट आस्मा ये तुने क्या किया.... इतकी घाई करायला नको होती ' मला राहून राहून काळजी वाटायला लागली ... इतक्यात मेसेज टोन वाजला... मेसेज होता THIS IS MAKARAND .....' या खुदा ' माझा जीव भांड्यात पडला...मला खरं तर खूप आनंद झाला होता. आता त्याच्याशी हवं तेव्हा बोलता येणार होतं ' शाबाश आस्मा !!! ' मी स्वतावरच जाम खुश झाले . ' पण त्याने इतका वेळ का लावला रिप्लाय द्यायला ?? मला घाबरवण्यासाठी?? आता मी पण घाबरवते त्याला....' मी पण बऱ्याच वेळाने रिप्लाय दिला... मला नक्की माहित आहे ... माझा रिप्लाय मिळेपर्यंत घाबरलेलाच असेल तो .... बेचारा !!!