Friday, June 24, 2011

.... आसमाँ - भाग- ४ .....


" thank god..... this is Aasma ...."
५० व्या वेळेला हा मेसेज वाचून मी तितकाच खुश झालो जितका पहिल्यावेळी घाबरत घाबरत वाचताना झालो होतो...हा जगातला माझ्यासाठीचा सगळ्यात सुंदर मेसेज असेल ..... मी विचार करत होतो....कालचा दिवस काही निराळाच होता .... अचानकपणे साहेब मला गुहागाव ला पाठवतात काय .....! गाडीत अनपेक्षितपणे आसमाँ  भेटते काय....!! आणि तिने सीट वर लिहिलेल्या कोड्याचं रहस्यभेद करून मला तिचा मोबाईल नंबर मिळतो काय......!!! अगदी शेरलॉक होम्सला होणार नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद मला ते नाजूकसं रहस्य उलघडल्यावर झाला होता . मोबाईल फोनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला मला कडकडून मिठी मारावीशी वाटली......तंत्रज्ञानाचा इतका चांगला उपयोग दुसरा कोणताच नसेल.....आता आपण कधीही तिला फोन किंवा मेसेज करू शकतो , ह्या विचाराने माझ्या मनात उत्सुकता आणि समाधान ह्याचं विचित्र मिश्रण तयार झालं.
पण कधीही का???.... आत्ताच करू कि फोन..... नको ....फोन नको..... ऑफिस मधून काय बोलणार? .... आणि तिच्याशी बोलताना भंबेरी उडते आपली ..... मग काय करूया??? मेसेज पाठवूया का? ?? .... येस... मेसेजच पाठवू ... माझ्या मनात द्वंद्व चालू होतं......खूप सारा विचार करून मी पहिला मेसेज टाईप केला ....
......... hi Aasma , kashi aahes?
... Makarand. माझं नाव पण लिहिलं खाली.... न जाणो.... तिने माझा नंबर सेव्ह केला असेल ., नसेल.... मेसेज लिहून झाला होता....मेसेज सेंड चे बटन दाबताना माझा सगळा जीव माझ्या अंगठ्यात गोळा झालाय असं वाटत होतं.... बटन दाबलं.... मेसेज गेला .... धनुष्यातून सुटलेला बाण..... आणि मोबाईल मधून गेलेला मेसेज.....ह्यात नक्कीच साम्य आहे, असं मला उगाचच वाटू लागलं . मी मोबाईल बाजूला ठेवला... आणि तिचं मोबाईल तिच्या आसपासच असू दे अशी प्रार्थना करीत डोळे मिटले...
--" काय रे, काय झालं ???   मघापासून बघतोय , टेन्शन आहे का काही ?? " आनंद विचारत होता.
-- " काही नाही रे ., सहजच .... " मी सारवासारव केल्यासारखं उत्तर दिलं... आनंद ने पुढे काही विचारलं नाही. तो आपलं काम करू लागला. आता प्रत्येक क्षण मला वर्षासारखा भासू लागला... मी खाली मान घालून काम करत होतो...पण माझे कान मात्र तो मेसेज टोन ऐकण्यासाठी आसुसले होते...... आणि इतक्यात तो वाजला...त्याला पूर्ण वाजुही न देता मी त्यावर झडप घातली.... मेसेज बघितला....
....... hi , . mi majet .....tumhi kase aahat ??? ......
चला , रिप्लाय तर आला...आणि माझी विचारपूस केलेली पाहून बरंही वाटलं....आता त्याला उत्तर द्यावंच लागेल.....
... mi pan majet.... baki , tu great aahes...
... mobile no. denyachi style aavadli.......
तिच्या ह्या बुद्धीचं कौतुक करावंच लागेल... ..म्हणून एक शिफारस करून टाकली...
..... tumhi pan great aahat...
...... mobile no. barobar olakhalat....
तिने माझीही स्तुती केली ..... मला , शाळेत प्रशस्तीपत्रक मिळाल्यावर होतो तसा आनंद झाला......
त्या नंतर आम्ही बराच वेळ मेसेज-- मेसेज खेळत बसलो..... तिला मेसेज फ्री होते बहुतेक.... माझा मेसेज तिला गेला कि लगेच तिचा मेसेज हजर. ! ... माझे मात्र प्रत्येक मेसेजगणिक ५० पैसे जात होते..... आतापर्यंत बरेच पैसे गेले असणार ... माझ्या व्यवहारी मनाने मला आठवण करून दिली..... संवाद साधण्याची  ही असली पद्धत भलतीच महाग पडत होती.....पण मस्त वाटत होतं..... काहीतरी वेगळं..... मेसेज सेंड केल्यापासून ते तिचा रिप्लाय येईपर्यंतचा कालावधी भलताच विचित्र !!...... वाट पाहायला लावणारा.!!!.....पण ते वाट पाहणं पण खूप छान होतं.... कधीही जास्त फोन किंवा मेसेज न येणारा माझा फोन आज अचानक ठणाणा कसं काय करतोय ?? असा प्रश्न ऑफिस मधल्या बऱ्याच जणांना पडला असावा......उम्या आणि आनंद तर माझ्याकडे संशयाने पहात होते....पण मी काही तिकडे जास्त लक्ष दिलं नाही .... माझं काम पण ह्या अजब खेळामुळे होत नव्हतं..... शेवटी मी ठरवलं..... आता तिला भेटण्याबद्दल विचारूया ....
..... aapan bhetuya ka kuthe tari ???.....
हा मेसेज मी पाठवला खरा .!!! ... पण मग मला भीती वाटायला लागली....बराच वेळ झाला, तिचा रिप्लाय पण आला नाही.... लगेचच हे विचारायला नको होतं......ती काय विचार करत असेल...?? आपण सहज ह्याला फोन नंबर दिला आणि हा लगेच भेटण्या बिटण्याच्या गोष्टी करायला लागला..... मनात हा विचार सुरु असतानाच मेसेज टोन वाजला ...
.... ho ,. bhetuya na......
..... udya sandhyakali... 6 la mandvila ... jamel na ???
हा मेसेज बघून लॉटरी लागल्यावर होतो तसा आनंद मला झाला ..... न जमण्याचा तर प्रश्नच नव्हता.....आनंदाच्या उकळ्या फुटणे हा वाक्प्रचार मी स्वतः अनुभवत होतो....... ऑफिस सुटायची वेळ पण झाली ..... सकाळी कामासाठी उघडलेली फाईल एकही शब्द न लिहिता मी बंद केली होती...........
.