Sunday, June 12, 2011

..... आसमाँ ... भाग - ३


-- " मोहिते साहेब , साहेबांनी आत बोलावलंय."  शिपाई, शिगवण मला सांगत होता .
-- '' काय काम आहे ? '' मी सहज त्याला विचारलं .
-- '' मला काय माहित? '' शिगवण ने खांदे उडवले. आत गेल्यावर साहेबांनी बसायला सांगितलं . मी बसलो . ' बसायला सांगितलं म्हणजे नक्की काहीतरी मोठं काम असणार... ' मी विचार करत होतो .
-- " मोहिते , तुम्हाला गुहागाव माहिती आहे का ?" साहेबांनी प्रश्न केला. ' अरे देवा म्हणजे गुहागावला जायला लागणार कि काय? ' मी मनात विचार केला
-- " नाही साहेब.. कुठे आहे ते ? " मी साळसूदपणे विचारलं .
-- " अहो तुम्हाला गुहागाव माहित नाही ?? " साहेब आश्चर्य चकित झालेले दिसले. " ठीक आहे " म्हणत त्यांनी बेल वाजवली . ' चला बर झालं...एवढ्या लांब जायचा त्रास वाचला ' मी मनात हा विचार करत असतानाच शिगवण आत आला.
-- " अं... शिगवण , मोहितेंना जरा गुहागावला कसं जायचं ते सांगा , आणि मोहिते , तुम्हाला आत्ताच निघावं लागणार आहे. ह्या काही खूप महत्वाच्या फाईल्स आहेत त्या गुहागावच्या आपल्या ऑफिस मधल्या फक्त सामंत साहेबांनाच द्यायच्या." साहेब मला सांगत होते. ' आयला मरण काही चुकत नाही ' खरं तर मला जायला काही अडचण नव्हती . सकाळी लवकर सांगितलं असतं तर मी आनंदाने गेलो असतो. एस. टी. ने ३-४ तास लागतात तिथे जायला. आणि संध्याकाळी परत यायला गाड्याही जास्त नाहीत . हाल होतात जीवाचे !...
-- " अं .... साहेब, जायलाच लागणार का?.... म्हणजे , सामंत साहेब नसले तर?? " मी आपला शेवटचा प्रयत्न करून पाहिला.
-- '' मी आत्ताच बोललोय त्यांच्याशी फोन वर ... आहेत ते ...तुम्ही निघा आता लवकर ... " साहेबांनी मला पिटाळंलच ... ' आयला ह्या साहेबाच्या , ह्याला दुसरं कोणी भेटला नाही वाटत. चला मकरंद साहेब , कामाला लागा'   म्हणत मी बाहेर आलो. उम्या माझ्याकडे बघत हसत होता. त्याने बहुतेक ऐकलं होतं सगळं . मी हताश पणे त्या फाईल उचलल्या . शिगवण मला सांगत होता कसं जायचं ते .... मला माहित होतं तरी ऐकत होतो. ' साला मीच कसं काय दिसतो ह्याला... आता फाईल पोहोचवणं काय माझं काम आहे ?? शिपाई मेलेत काय? ' असा विचार करत मी बस स्थानकात पोहोचलो. .... माझ्या नशिबाने गुहागाव बस लागलेलीच होती .. आणि त्यात जास्त गर्दी पण नव्हती . मी मस्त खिडकी पकडून बसलो. ' जाऊ दे च्या आयला, ऑफिस मध्ये खर्डेघाशी करण्यापेक्षा हे बर आहे . फिरायला तरी मिळेल ' असा सकारात्मक विचार डोक्यात आल्यावर मला जरा बर वाटलं . गाडी सुटायला अजून थोडा वेळ होता. अर्धी गाडी भरली होती. मी एखादा चांगला चेहरा दिसतोय का ते पाहत होतो. २-३ कॉलेज च्या मुली गाडीत चढल्या. चांगल्या होत्या दिसायला . माझ्या बाजूची सीट रिकामीच होती ... ह्यातली एखादी सुंदर तरुणी बाजूला बसली तर ... असा विचार करत असताना त्या तिघी जवळ आल्या आणि मला ओलांडून, मागे जाऊन बसल्या . ' छ्या......नेहमीप्रमाणे .... नशिबच खराब आपलं. ' गाडीत प्रवास करताना कधीही एखादी गौरांगना अथवा सुंदर तरुणी माझ्या बाजूला बसल्याचं मला आठवत नाही... आमच्या बाजूला बसणार कोण ? तर .... एखादा खोकून खोकून बेजार झालेला म्हातारा ...., खांद्यावर डुलक्या घेणारा एखादा माणूस ... नाईतर उलट्या करणारी लहान पोरे.... ' इथून पुढे चांगल्या अपेक्षा करायच्या नाहीत. आता एखादा म्हाताराच येऊ दे बाजूला बसायला... ' मी माझ्या मनाची समजूत घातली.... आणि माझी ती इच्छाही लवकर पूर्ण झाली . एक आजोबा गाडीत चढले ... सगळ्या खिडक्यांवर त्यांनी एकदा नजर टाकली... आणि थोड्या निराशेने माझ्याच बाजूला येऊन बसले. ' धन्यवाद देवा' , ह्या असल्या इच्छा लगेच पूर्ण होतात. मी खिडकीबाहेर बघू लागलो. त्या आजोबांना बहुतेक १ सीटची जागा कमी पडत होती. " अहो, जरा आत सरका ना...ती पिशवी कशाला ठेवली खिडकीपाशी?? सरका जरा...." आजोबा बहुतेक आजींशी भांडून आले असावेत , ते माझ्यावर खेकसले.आणि मला अगदी खेटूनच बसले. ' काय साला वैताग आहे....' कंडक्टर ने बेल दिल्यावर गाडी सुरु झाली. थंड वारा चेहऱ्यावर आल्यावर जरा बर वाटलं. ' आता काय ? झोपून जाऊ ... आजोबांशी काय गप्पा मारायच्या ? ' मी मनात म्हणत असतानाच गाडी एका stop वर थांबली . दोन स्त्रिया गाडीत चढल्या . पहिली बाई जी गाडीत चढली , मी तर तिच्याकडे बघतच राहिलो . इतका गोरा वर्ण मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता. तिने बुरखा घातलेला होता . पण त्यातूनही तिचा कमनीय देह दिसत होता. मी थोडं आजूबाजूला पाहिलं तर गाडीतला समस्त पुरुषवर्ग माझं अनुकरण करत असलेला मला दिसला. तिच्या मागे सहज माझं लक्ष गेलं. तर दुसरं आश्चर्य माझी वाट पाहत होतं. ' आसमाँ  आहे का ही??? अरे हो.. तीच आहे ...' मला इतका आनंद झाला म्हणून सांगू !  त्या समोरच्या सौंदर्यवतीहून माझं लक्षच उडालं. तिला मी दिसावा म्हणून जरा ताठ बसलो. त्या दोघी जवळ येत होत्या. आसमाँ  ने माझ्याकडे बघितलं, पण न बघितल्यासारखा केलं. ' अरे हे काय? ही अशी काय वागते आहे ?' माझं मन एकदम खट्टू झालं. ' नेकी कर, और दर्या में डाल ', ' पण मी तर तिलाच 'दर्यातून' बाहेर काढलं आहे' , जाऊ द्या मकरंदराव आज तुमचा दिवसच खराब आहे.' मी नैराश्येने एकदा खिडकी बाहेर बघितलं.
-- '' भाभी, इधर बैठते है..." ती तिच्या समोरच्या त्या सौंदर्यवतीला उद्देशून म्हणाली. आणि आसमाँ  आणि तिची भाभी माझ्या समोर , बाजूच्या रांगेत बसल्या . त्या माझ्या तिरप्या दिशेत बसल्या होत्या . तिची भाभी आत आणि ती बाहेर बसल्याने मला ती बरोब्बर दिसत होती. ' अच्छा.... तिच्याबरोबर तिची भाभी असल्याने तिने ओळख दाखवली नाही तर....' ह्या विचाराने मला जरा हायसं वाटलं. थोडा वेळ गेल्यावर आसमाँने मागे शोधक नजरेने पाहिल्यासारखं केलं आणि माझ्याकडे एक कटाक्ष टाकला.   ' thank god ' मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले... मी तर तिच्याकडेच बघत होतो. तिने पाहिल्यावर मी पण समजुतीने मान हलवली . आता मला कशाचाही त्रास जाणवत नव्हता.. ना रस्त्यातल्या खड्यांचा , ना थडथडनाऱ्या गाडीचा , ना गाडीतल्या गर्दीचा , ना मला खेटून बसलेल्या आजोबांचा .... थोड्या थोड्या वेळाने आसमाँ  मागे पाहून मला संजीवनी देत होती. मस्त वाटत होतं. वाटलं , हा प्रवास असाच चालू राहावा जगाच्या अंतापर्यंत... आसमाँ  तिच्या भाभीशी बोलत होती... नंतर त्या बोलायचं थांबल्या. तिच्या भाभीला झोप लागली होती बहुतेक .... काही वेळाने आसमाँने तिच्या पर्स मधून पेन काढलं... आणि पुढच्या सीट वर काहीतरी लिहू लागली...ती काय लिहितेय हे पाहण्यासाठी मी जरा मान वाकडी करून पाहू लागलो, आणि माझं  डोकं शेजारच्या आजोबांना लागलं. आजोबांनी त्रासिकपणे माझ्याकडे पाहिलं... मी ओशाळलेपणाने त्यांची माफी मागितली. ' काय कटकट आहे ह्या म्हाताऱ्याची... जरा हलू देत नाही... ' पण तो विचार झटकून मी पुन्हा तिने काय लिहिलंय ह्याचं निरीक्षण करू लागलो. मला त्याचा काही बोध होईना... सगळं लिहून झाल्यावर तिने हळूच मागे पाहिलं आणि पेनाने लिहिल्याच्या ठिकाणी खुण केली... मला कळलं कि ते माझ्यासाठी काहीतरी आहे म्हणून.... आणखी थोडं वेळ गेला आणि नंतर त्या उतरण्यासाठी निघाल्या . पण जाताना आसमाँने मागे वळून पाहिलं नाही... .मी झटकन माझ्या जागेवरून उठलो आणि आस्मा बसलेल्या जागेवर जाऊन बसलो. पाहिलं तर इंग्रजी मधलं A हे कॅपिटल अक्षर आणि पुढे काही आकडे होते... ५ आकडे वर आणि ५ आकडे खाली... ' आयला हे काय आहे ? ' मग माझ्या डोक्यात हजारो दिव्यांचा प्रकाश पडला... A म्हणजे आस्मा आणि पुढे लिहीलेला तिचा मोबाईल नंबर.. येस्स ....लवकर कळू नये म्हणून तिने ५-५ च्या गटात आकडे लिहिले होते. ' वा... हुशार आहे पोरगी ....' मला जाम आनंद झाला होता . तो नंबर मी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह केला आणि खबरदारीचा उपाय म्हणून सीट वरचा नंबर खोडून टाकला... तोपर्यंत गुहागाव ही आलं. मी त्या फायली सुखरूप पणे सामंत साहेबांना दिल्या ...माझं काम संपलं होतं... पण आता मला निराळ्याच चिंतेने ग्रासलं ...' हा नंबर तिचाच असेल कश्यावरून ??? तिच्या भाभीचा असेल तर?'... नाही , ती असा मूर्खपणा करणार नाही.... काय करूया आता ?? बराच वेळ विचार केल्यानंतर मी त्या नंबर वर एक मेसेज पाठवला ' this is Makarandh '. आणि रिप्लायची आतुरतेने वाट पाहू लागलो... १० मिनिटे झाली , २० मिनिटे झाली तरी रिप्लाय नाही.... ' अरे देवा .... मेसेज पाठवण्यात आपण घाई तर केली नाही ना...??'  मला जाम भीती वाटायला लागली. इतक्यात मेसेज टोन वाजला ... घाबरत घाबरत मी तो पाहिला.... लिहिलं होतं... THANK GOD ..... this is Aasma .....