Sunday, June 5, 2011

....आसमाँ .... भाग -२ ....

                  नाष्टा करण्यासाठी संध्याकाळी बाहेर पडलो. पाकिटात बघितलं तर फक्त १० रुपयाची नोट ...चला आता ATM पर्यंत चालत जावं लागणार . आमच्या बँकेचं ATM बराच लांब म्हणजे वाळनाक्यावर ... संध्याकाळी हनुमान मंदिर परिसरात चांगल्या मुली दिसतात . मी इकडे तिकडे न्याहाळत चाललो होतो. ATM पाशी गेल्यावर बघतो तर ५-६ जण त्या रांगेत उभे ... सगळ्यांचे पैसे आजच संपावेत ??? असा विचार करत मीही त्या रांगेत उभा राहिलो. पूर्वी त्या बँकेत रांगा लावायला लागायच्या आता ATM समोर रांगा लावाव्या लागतात ' साला कितीही सोई सुविधा तयार करा, रांग काही चुकत नाही' . काही काही माणसं मुद्दाम त्या ATM मशीन शी खेळत होती तर काहीना पैसे कसे काढायचे ते कळत नव्हत . शेवटी कसातरी माझा नंबर आला. पुढचा माणूस पैसे काढत होता . मी पाठच्या खिशातल्या पाकिटातून ATM कार्ड काढलं तोच माझ्या मागे काळे कपडे घातलेलं कुणीतरी उभं आहे असं जाणवलं. मी सहज मागे पाहिलं तर काळ्या बुरख्यामध्ये १ मुलगी उभी होती. अरे देवा !! हि तर आसमाँ  !! माझा हृदय जोराने धडाडल. त्या जेटीवरच्या प्रसंगानंतर मी तिला शोधण्याचा किती प्रयत्न केला . !!! आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना ती दत्त म्हणून समोर ( कि पाठी ?) उभी होती. ATM मध्ये गेलेल्या माणसाने पैसे काढले आणि तो बाहेर येऊ लागला. मी आत गेलो . मला काही सुचत नव्हतं . मी किती पैसे काढले , माझं मलाच कळले नाही. पैसे काढून बाहेर आलो. ती माझ्या समोर उभी होती. माझी आणि तिची नजरानजर झाली. तिनेही मला ओळखलं , निदान तिच्या डोळ्यातल्या बदललेल्या भावांवरून मला ते लगेच कळलं. ती काही बोलणार इतक्यात मी मान वळवली आणि चालू लागलो. ' मूर्खा काय करतोयस ?? थांब आणि बोल.' माझं १ मन सांगत होतं तरी पाय थांबले नाहीत .  मी तसाच पुढे निघालो. ' १ नंबर चा गाढव आहेस , चांगला चान्स सोडलास, निदान स्माईल तरी द्यायची होतीस , तू काहीच करू शकत नाहीस, मूर्ख ....' मी स्वतालाच दोष देत तसाच पुढे निघालो. मला माझा स्वताचाच खूप राग येत होता. पण काय करणार, वेळ निघून गेली होती. आता ती परत कशी काय भेटणार?? शेवटी मी वैतागून 'गोकुळ' मध्ये गेलो. आणि १ चहा सांगितला. मला कळत नव्हतं कि मी असं का वागलो ते . मी खरंच खूप गोंधळून गेलो होतो. मी मनातल्या मनात स्वताला इतक्या शिव्या दिल्या होत्या कि त्यामुळे माझ्या अंगातली शक्ती नाहीशी झाल्यासारखी वाटत होती. मी हताशपणे समोरच्या रस्त्याकडे पाहत बसलो. शून्य नजरेने..... गाड्या, माणसे येत जात होती.... अचानक १ आकृती मला ओळखीची वाटली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता अरे हो तीच !! आस्मा ! ती एकटी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चालत होती. मी यांत्रिक पणे उभं राहिलो. " सचिन, चहा ठेव , मी आलोच थोड्या वेळात "
-- " पण चहा तयार आहे साहेब."
-- ठेव रे, मी आलोच ५ मिनटात. "
गोकुळ मधून बाहेर पडलो . माझी नजर तिच्यावरच खिळली होती. ती स्टेडीयम च्या रस्त्याने पुढे चालली होती. त्या रस्त्याला १ समांतर रस्ता जात होता. आणि त्या २ समांतर रस्त्यांना जोडणारा रस्ता पुढे होता. ' मक्या, तुला देवाने आणखी १ संधी दिली आहे.' मी वेड्यासारखा त्या दुसऱ्या रस्त्याने धावत सुटलो. माझ्या अंगात वेगळीच शक्ती संचारल्यासारख मला वाटलं .वाटेत येणाऱ्यांना मी चुकवत जोरात पळत होतो. त्या समांतर रस्तांना जोडणारा रस्ता लागला. धावल्याने मला धाप लागली होती. जोरजोरात श्वास घेऊन मी माझा श्वास सारखा केला, जेणेकरून मी धावत आलो आहे हे तिला कळू नये. आणखी १ उजवे वळण आणि ती बरोब्बर माझ्या समोर येणार होती. मी शांतपणे चालू लागलो. ते उजवे वळण घेतल, रस्ता क्रॉस केला, पाहिलं तर ती समोरून येताना दिसली . तिने मला पाहिलं , मी तर आता तिच्याकडेच बघत येत होतो. तिच्यातलं आणि माझ्यातलं अंतर क्षणाक्षणाला कमी होत होतं. २० फुट ... १० फुट.... ५ फुट ... कम ऑन मक्या बोल .....असं मी मनाशी म्हणत असतानाच समोरून आवाज आला.
--- "अरे आप यहा ?? ''
--- '' हां ss  ... इथेच जात राहा था.....'' दोन भाषांची मिसळ झाली हे मला कळलं. मी पुरताच गोंधळून गेलो होतो. खरं तर मीच बोलायला सुरुवात करणार होतो . चालता चालता मी मनात पाहिलं वाक्य पण पाठ करून ठेवला होतं पण तिनेच सुरुवात केल्याने माझा गोंधळ उडाला. माझ्या ह्या उत्तरावर ती गोड हसली ... मला फेंगशुईच्या , दरवाज्याजवळ लावलेल्या , आणि वारा आल्यावर होणाऱ्या नळ्यांच्या त्या किणकिणाटासारखा भास झाला.
--- '' ' त्या ' दिवसापासून तुम्ही तर दिसलाच नाहीत ... मला तुम्हाला नीट thank you. पण म्हणता नाही आलं. '' मघाशी झालेल्या गोंधळामुळेच कि काय , तिने सरळ मराठीत सुरु केलं. तिचं मराठी खरंच चांगलं होतं .
---'' छे ... त्यात thank you. काय म्हणायचं....'' काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलून गेलो.
--- '' नाही , खरंच thank you. .... तुम्ही नसतात तर मी वाचले नसते .''
--- ''बचाने वाला तो वो खुदा है ...'' आपणही हिंदीत काही कमी नाही हे दाखवून देण्यासाठी मी पण एक डायलॉग मारला , पण पुढे " मी फक्त निमित्तमात्र आहे '' हे वाक्य लगेच भाषांतरित करता न आल्याने मराठीतच बोलून टाकले.
--- '' हो... बरोबर आहे ...." ती होकारार्थी हसली.
--- '' मी मघाशी तुम्हाला ATM पाशी पाहिलं ......''
--- '' पण ओळखला नाहीत नं ?? . मी पण तुम्हाला पाहिलं . मी काही बोलायच्या आताच तुम्ही निघून गेलात. मला खरंच राहून राहून वाटत होतं कि तुम्ही आता भेटता कि नाही. , आपका शुक्रिया अदा करनेका एक मोका मिला था वो भी मैने गवा दिया इसी लिये मै अपने आप को कोसती रही. पण चांगलं झालं कदाचित आपण भेटणार होतो , म्हणून आता परत भेटलो ''  मला तिला सांगावसं वाटत होतं कि , मी माझा चहा, नाश्ता सोडून , एवढ्या लांब धावत फेरा मारून तुलाच भेटायला आलो आहे. पण तसं काही बोलून फायदा नव्हता . मला तिच्या साधेपणाचा हेवा वाटायला लागला. तिच्या मनात होतं ते तिने सरळ बोलून दाखवलं.नंतर थोडा वेळ शांततेत गेला. ' मूर्खा , आणखी काहीतरी बोल नाही तर ती निघून जाईल..'
-- '' तुझं नाव काय?? '' मला माहित होतं तरी काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं
-- " आसमाँ  ... आणि तुमचं? "
-- " मकरंद ...तू राहतेस कुठे ? '' हे मात्र माहित नव्हतं
-- '' इथेच पुढे जवळच राहते. खंर तर मी तुम्हाला घरी घेऊन जायला पाहिजे पण मला आता कम्प्युटर क्लासला जायचं आहे . ... आपण नंतर भेटू. ...." 
-- " हो..... चालेल नं... बाय ...."
-- " thank you परत एकदा ...." 
आम्ही हसून एकमेकांचा निरोप घेतला ..
ठीक आहे , जास्त नाही पण आपण बोललो तरी !! मला एकदम हलक हलक वाटायला लागलं,.एकदम कर्जमुक्त झाल्यासारखं. आणि स्वताच्या कृतीवर हसूही यायला लागलं .गोकुळ मध्ये परत आलो.
-- '' अहो काय साहेब?? कुठे गेला होतात ? '' सचिन विचारत होता .
-- '' काही नाही रे... इथेच गेलो होतो ... चल १ चहा दे आणि वडा पाव पण.. जाम भूक लागलीय .... '' आजचा चहा नेहमीपेक्षा जरा जास्त गोड लागत होता .