Monday, May 23, 2011

.... आसमाँ .... भाग ...१

दुसरा आणि चौथा शनिवार असला कि सगळे घरी पळायचे , कारण २ दिवस सुट्टी असल्याने रत्नागिरीत बसून काय माश्या मारायच्या ?......म्हणून मग चलो घर ! पण ह्या शनिवारी मला जाम कंटाळा आला होता . ह्या शनिवारी इथेच राहायचा ठरवलं. म्हटलं बघू तरी एकट्याला अस किती बोअर होत?
'अरे पकशील २ दिवस त्या पेक्षा घरी चल ' आनंद म्हणाला

' हं ssssss मला माहित आहे हा साला इथे का थांबतोय ते ' ... उम्या नाकाला बोट लावत डोळा मारत म्हणाला
' हट साल्या तुला त्याच्याशिवाय काय दिसतंय?' मी म्हणालो, बघू २ दिवस राहून इथे जायचा यायचा कंटाळा आला यार.
' बघ बाबा आम्ही येईपर्यंत काही उद्योग वाढवू नको म्हणजे झालं- उम्या
'ठीक आहे ठीक आहे '- आता ह्या उम्याला काय बोलायचं म्हणून मी जास्त काही बोललो नाही .
ऑफिस मधून ते दोघे दुपारच्या जनशताब्दी ने गेले. ऑफिस पावणे सहा ला सुटले. दुसरा शुक्रवार असल्याने पुढच्या २ दिवस सुट्टी होती त्यामुळे बरेच जण आनंद आणि उम्यासारखे लवकर निघून गेले होते. ऑफिस सुटल्यावर घरी जायचा तर काही मूड नव्हता कारण घरी कोणीच नव्हत . कंटाळा आला कि आमचं फिरायचं एकच ठिकाण - ते म्हणजे मांडवी ! . शनिवार रविवार मांडवीला गर्दी असते , पण आज शुक्रवार असल्याने जास्त गर्दी नसणार , आणि तसेच झाले . अगदीच कमी माणसं होती त्या जेटीवर .बर झालं ! आता जरा निवांत पणे बसता येईल, असा विचार करून मी जेटीच पाण्यात गेलेलं शेवटचं टोक गाठलं .अगदी शेवटच्या चौथर्यावर जाऊन बसलो . पायाखाली लाटांच पाणी येऊन आदळत होतं. पांढरा फेस तयार होऊन लगेच विरघळत होता समोरचा सूर्य लालबुंद झाला  होता .मला सूर्यास्त बघायला फार आवडतो . एकामागोमाग लाटा पायावर येऊन आदळत होत्या .
- एवढी उर्जा पाण्यात कुठून येत असेल? असा विचार डोक्यात आला .
- पुराण काळात कोणी तरी ऋषी होते त्यांनी म्हणे सगळा समुद्र पिला होता . पण त्यानंतर त्यांचे काय हाल झाले असतील?
- हे पाणी किती खोल असेल?
- आता त्सुनामी आली तर ? हे असले काहीही विचार डोक्यात यायला लागले.
- आता मी बसलो आहे त्या जागेवरून जरा जरी डावीकडे सरकलो तर मी खोल पाण्यात पडेन - डाव्या बाजूचे काळे पाणी मला अधिकच भयानक वाटू लागले .मी नीट सावरून त्या कट्ट्यावर बसलो. खरंतर आज गर्दी नसल्याने कुणीच त्या जेटीच्या टोकाकडे फिरकतही नव्हते . तक्यात मागून काही मुलींचा हसण्याचा आवाज आला.मी सहज मागे वळून पहिला तर कला बुरखा घातलेल्या ३ मुली जेटीच्या टोकाशी येत होत्या .त्याचा चेहराही काळ्या फडक्याने झाकला होता फक्त डोळे उघडे होते . त्या तिघी कमालीच्या गोऱ्या होत्या निदान त्यांच्या डोळ्यावरून तरी ते दिसत होत . त्यातल्या एका मुलीने माझ्याकडे पाहिलं आणि मीहि तिच्याकडे ! माझी नजर तिच्या नजरेत अडकल्यासारखी झाली माझं र्हुदय जोराने धडकल्याच मला जाणवलं.तिचे डोळे मला गहिऱ्या सागरासारखे वाटले २-३ क्षणात ती माझ्या समोरून गेली . पण तिची नजर बाणासारखी लागली
--अय्या आपा कितना मस्त है ना? पुढे जाऊया अजून ??- ती मुलगी दुसरीला म्हणाली
- नाही हा आस्मा, ज्यादा आगे नही - ती दुसरी मुलगी पहिल्या मुलीला म्हणाली ...अच्छा तर तिचे नाव आस्मा होत तर!!!
आस्मा ... आस्मा ... मी वर आकाशाकडे बघितल. मस्त नाव आहे .त्या मुलींबरोबर आणखी १ मुलगी होती ,त्यांच्या पुढच्या संभाषणावरून असे कळले कि त्या तिघी बहिणी आहेत आणि बऱ्याच दिवसांनी मांडवीला फिरायला आल्या आहेत त्या ३ मुलींपैकी आस्मा आणि तिची छोटी बहिण पाण्यात जाऊन खेळायला लागल्या लाट जशी येईल तशी आस्मा आणि तिची छोटी बहिण मागे पळत येत होत्या .ती मधेच माझ्याकडे एखादी नजर टाकायची माझ्या हृदयात एकदम धस्स व्हायचे .उम्याला बुरखा घातलेल्या मुली जाम आवडतात. तो म्हणतो त्यांचं खंर सौंदर्य हे त्यांच्या डोळ्यात असतं.बरोबर बोलत होता साला !!! तिच्या डोळ्यात काजळ घातल्याने ते अधिकच आकर्षक दिसत होते.आस्मा आणि तिच्या छोट्या बहिणीची मस्ती चालू होती . त्या दोघी थोड्या पाण्यात जाऊन एकमेकींवर पाणी उडवत होत्या
. त्यांची मोठी बहिण त्यांना ओरडत होती पण त्या दोघी काहीही ऐकायच्या मनस्थितीत दिसत नव्हत्या .मीही त्यांचा तो पाणी उडवण्याचा खेळ बघत होतो. आस्मा मधेच माझ्याकडे बघत होती .खरच तिच्या डोळ्यातून सटां सट गोळ्या सुटत होत्या , आणि एव्हाना माझ्या शरीराची चाळण झाली होती . त्या खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली. ती लाट इतकी मोठी होती कि आस्मा आणि तिची लहान बहिण दोघी धडपडल्या , आस्मा जेटीच्या अगदीच बाजूला ढकलली गेली , आणि काही कळायच्या आत ती बाजूच्या खोल पाण्यात पडली ....अरे देवा !!! हे काय झालं ?? असं काही होईल असं वाटलंही नाही मला.तिची लहान बहिण मोठमोठ्याने रडायला लागली आणि मोठी बहिण जोरजोरात ओरडू लागली . त्यावेळी जेटीवर फक्त मी आणि त्या तिघीच होतो ,( आणि आता त्या दोघी...) अरे देवा , आता काहीही झालं तरी मलाच काहीतरी कराव लागणार होतं, कारण तिच्या दोघी बहिणी आरडाओरडा करण्यावाचून दुसरं काही करू शकत नव्हत्या .अचानक मला कहो ना प्यार है मधला तो सीन आठवला ज्यात मासे पकडायला गेलेली अमिषा पाय घसरून समुद्रात पडते आणि र्हीतिक रोशन पोहायला येत नसतानाही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो ( हा सीन मला त्या विचित्र वेळी का आठवला ते आजही कळले नाही) परंतु हृतिक आणि माझ्यामध्ये एक साम्य होतं - आम्हा दोघांनाही पोहता येत नव्हतंआणि आस्मा फक्त बुडण्याचा नाटकच करत असेल हि रिस्क मी तरी घेऊ शकत नव्हतो .एव्हाना आस्मा ने २-३ गटांगळ्या खाल्या होत्या . तिला खाली वाकून हातही देता येत नव्हता . अचानक मला माझी बैग आठवली आणि तिला असणारा तो पट्टामी तो पट्टा क्लिप मधून काढला आणि धावतच गेलो .

- आपा ... आपा...
- आस्मा ..... आस्मा .....दोघी बहिणी एकमेकींना हाक मारत होत्या .
- एक मिनिट , तिला हा पट्टा पकडायला सांगा , मी हा पट्टा पाण्यात टाकतोय ... मी तिच्या आपा ला म्हणालो.
- आस्मा ये पट्टा पकडले .. जल्दी ssssss तिची आपा तिला ओरडून सांगत होती. आस्मा तो पट्टा पकडण्याचा प्रयत्न करत होती पण पाण्याच्या लाटेमुळे तो तिला पकडता येत नव्हता.अखेर कसाबसा तिने तो पट्टा पकडला , मी आणि तिची मोठी बहिण तिला खेचू लागलो . तिची छोटी बहिण आम्ही काय करतोय ते पाहण्यासाठी जवळ आली

- पीछे हट रेहाना , नै तो तू भी जायेगी पानी में....आपा चा जोरदार ओरडा काहून तिची छोटी बहिण रेहाना मागे सरकली . आम्ही दोघांनी मिळून आस्मा ला बाहेर काढलं.पाणी नाकातोंडात गेल्याने ती खोकत होती .तिच्या आपाने तिला जोरदार मिठीच मारली , आणि ती रडायला लागली ह्या सर्व गोंधळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि आस्मा च्या तोंडावरचा तो काळा पडदा पाण्यात कुठेतरी गायब झाला होता. आणि इतका वेळ नुसत्या डोळ्यांनी गोळ्या मारणाऱ्या आस्मा चा मुखचंद्र माझ्या समोर होता . अप्रतिम लावण्य.... आणि ते हि भिजलेलं.... पाण्यामुळे तिच्या डोळ्यातलं काजळ विस्कटून डोळ्याच्या आजूबाजूला पसरलेलं....पण त्यातही ती अतिशय सुंदर दिसत होती . तिचा बुरखा भिजून अंगाला चिकटलेला होता.... . केस भिजलेले ... कानातल्या झुमक्यांतून अजूनही थेंब थेंब पाणी टीपकत होतं.
- आपा, मै तो मर हि गई थी.... असं म्हणून आस्मा तिच्या बहिणीच्या गळ्यात पडली आणि रडू लागली .
- हट पगली ऐसा नही बोलते .... असं म्हणून तिची बहिण तिला समजाऊ लागली .' ये भाईसाब थे इसी लिये अच्छा हुआ , शुक्रिया जी ' आस्मा ने ह्यावेळेस माझ्याकडे पाहिलं .तिचे डोळे जणू मला सांगत होते .. thank you ... thank you very much .....
-चल अब घर चालते है ... चल रेहाना ....
त्या तिघीही जाऊ लागल्या मी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत उभा राहिलो .त्या थोडा पुढे गेल्या असतील तोच आस्मा ने पुन्हा एकदा माडे वळून माझ्याकडे पाहिलं .त्यावेळी तिच्या डोळ्यात धन्यता , कृतज्ञता , प्रेम असे किती भावांचे प्रकार असतील तितके भाव दाटले होते . " अगर खुदा ने चाहा तो इसी आस्मा के नीचे हम फिर मिलेंगे " असेच काहीसे तिचे डोळे सांगताहेत असं मला वाटलं